परवाना नसतानाही नव्या ग्राहकांना थ्रीजी सेवा पुरविणाऱ्या आयडिया सेल्युलर लिमिटेड (आयसीएल) आणि तिचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांना दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी नोटिसा बजावल्या आहेत़  न्यायालयाचा अवमानप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हे आदेश दिल़े
या नोटिशीनुसार न्या़  राजीव शाक्धर यांनी संबंधित टेलिकॉम कंपनी, बिर्ला यांच्यासमवेत इतर पाच जणांना चार आठवडय़ांत आपली बाजू मांडण्याचे आदेश दिले आहेत.  त्यात आयसीएलचे व्यवस्थापकीय संचालक हिमांशू कपानिया, कंपनीचे मुख्य वित्त अधिकारी अक्षय मुंद्रा, कंपनीचे सचिव पी़  लक्ष्मीनारायण आणि पंकज कपदेव यांचा समावेश आह़े  तसेच या प्रकरणाची सुनावणी ५ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली आह़े
नव्या ग्राहकांना थ्रीजी जोडणी न देण्याबाबत एप्रिल १२ मध्ये न्यायालयाने दिलेल्या आदेशांचा संबंधित कंपनी आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक अवमान केल्याचा आरोप करणारी याचिका दूरसंचार मंत्रालयाने न्यायालयात दाखल केली होती़  न्यायालयाने दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी करण्याऐवजी आयडियाने प्रतिज्ञापत्र सादर करून, निकषांत बसणाऱ्या ग्राहकांना ‘थ्रीजी सेवा पुरविणार’ असल्याचे न्यायालयाला कळविल़े  मात्र न्यायालयाने असे कोणतेही निकष दिले नव्हत़े  त्यामुळे २०१२ एप्रिलमधील आदेशांचे पालन करणेच आयडियाला भाग होत़े  मात्र निकषांची सबब पुढे करून कंपनीने न्यायालयाने थ्रीजी सेवेवर लादलेल्या अटी झुगारून देण्याचा प्रयत्न केला़  हा न्यायालयाच्या आदेशाचा अवमान असल्याचे दूरसंचार मंत्रालयाचे म्हणणे आह़े