ड्रोन या अगदी छोटय़ा हेलिकॉप्टरचा उपयोग केवळ दहशतवादविरोधी कारवाईत होतो असे नाहीतर काहींची पोटपूजाही या ड्रोन्सच्या मदतीने होणार आहे. भूक लागल्यानंतर आपण पिझ्झा ऑर्डर करतो, नंतर कंपनीची गाडी घेऊन मुले तो पिझ्झा तुमच्या घरी आणून देतात हे सर्वसाधारणपणे आजचे चित्र आहे, पण आता ड्रोन हेलिकॉप्टर पिझ्झा तुमच्या घरी आणून देणार आहेत.
   अर्थात, यात डिलिव्हरी बॉयची आवश्यकता संपणार आहे. अमेरिकेतील डॉमिनो पिझ्झा या रेस्टॉरंटने पिझ्झा ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ड्रोनवर आधारित ऑक्टोकॉप्टरचा वापर करण्याची शक्यता अजमावण्याचे प्रयोग सुरू केले आहे. टी प्लस बिस्किट्स या सर्जनशील संस्थेला या चाचण्या करण्याचे काम देण्यात आले आहे. सध्या तरी दुकानाच्या सहा किलोमीटर त्रिज्येच्या परिसरात असलेल्या ग्राहकांना दोन मोठय़ा आकाराचे पिझ्झे दहा मिनिटांत पोहोचते करण्याची क्षमता डॉमिकॉप्टर या छोटय़ा विमानांमध्ये आहे. त्यांचे प्राथमिक रूप तयार करण्यात आले असून यापुढे त्यात जीपीएसचा वापर केला जाईल. सध्या ड्रोन उड्डाणात निपुण असलेल्या व्यक्ती त्यांचे नियंत्रण करीत आहेत.
डॉमिकॉप्टरला आठ पाती आहेत व त्यात प्रमाणित उष्णता प्रतिबंधक पिशवी आहे, ती सध्याही डॉमिनो पिझ्झा पोहोचवण्यासाठी वापरली जाते. एरोसाइट या कंपनीने हे ड्रोन हेलिकॉप्टर तयार केले असून, सध्या त्याचा वापर कॅमेऱ्याने चांगल्या व्हिडिओ चित्रीकरणासाठी केला जात आहे.
एनबीसी न्यूजने म्हटले आहे, की या ड्रोन कॉप्टर्सना १२६ मीटर अंतरापर्यंत परवाना लागत नाही. टी बिस्किटचे संस्थापक टॉम हॅटन यांनी सांगितले, की डॉमिकॉप्टरसाठी अगोदर पेपेरड्रोनी, हवाइयन अशी नावेही विचाराधीन होती. पहिल्या ड्रोन उड्डाणानंतर डॉमिकॉप्टर तपासणीसाठी डॉमिनोजच्या इंग्लंडमधील मुख्यालयात पाठवले जाईल.