बाबा-मांत्रिकाचे गंडेदोरे, डॉक्टरच्या औषधांचा महागडा नुस्खा आदी पाहुणचारांनीही निराशा हद्दपार होत नसल्याचा अनुभव असल्यास सहज उपलब्ध टोमॅटो या फळभाजीला निराशामोचक बनण्याची संधी देण्याचा सल्ला संशोधकांनी दिला आहे. आठवडय़ातून काही वेळा टोमॅटोचे सेवन करणारी व्यक्ती नैराश्याने ग्रासण्याची शक्यता पन्नास टक्क्य़ांनी कमी असते, असे अभ्यासकांच्या निदर्शनास आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणते संशोधन?
 संशोधकांनी ७० वर्षे व त्यापेक्षा जास्त वयोगटांतील १००० स्त्री-पुरुषांचा अभ्यास केला. त्यात त्यांचा आहार व मानसिक आरोग्य यांच्या नोंदी विचारात घेण्यात आल्या. त्यांना असे दिसून आले की, आठवडय़ातून दोन ते सहा वेळा टोमॅटोचे सेवन करणाऱ्या व्यक्तींना नैराश्य घेरण्याची शक्यता ४६ टक्के कमी होती. रोज टोमॅटोच्या सेवनाने नैराश्याची शक्यता ५२ टक्क्य़ांनी कमी होते. इतर फळे व भाज्यांमुळे इतक्या मोठय़ा प्रमाणात चांगला परिणाम साधला जात नाही. कोबी, गाजर, कांदा व भोपळा यामुळे व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर कुठलाच चांगला परिणाम दिसून आलेला नाही.

काय असते टोमॅटोमध्ये?
टोमॅटोमध्ये अँटिऑक्सिडंट रसायने भरपूर असतात. त्यामुळे अनेक रोगांना अटकाव होतो. त्यात लायकोपिन हे अँटिऑक्सिडंट असल्याने टोमॅटोचा रंग गर्द लाल असतो व त्यामुळे पुरस्थ ग्रंथीचा कर्करोग व हृदयविकार यांनाही अटकाव होतो. टोमॅटोतील लायकोपिनमुळे मानसिक व शारीरिक आरोग्य चांगले राहते. मेंदूच्या पेशींवरील ताण कमी होतो. जपानमधील एक हजार वयस्कर व्यक्तींची पाहणी करण्यात आली असता त्यातून हे निष्कर्ष सामोरे आले आहेत.  चीन व जपान या देशांच्या संशोधक चमूने चीनच्या तिआनजीन मेडिकल युनिव्हर्सिटीचे डॉ कैजुन निऊ यांच्या नेतृत्वाखाली संशोधन केले. ‘जर्नल ऑफ अफेक्टिव्ह डिसऑर्डर्स’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eat tomato and keep away nervousness