या वर्षअखेरीस पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार असून, लोकसभेच्याही मुदतपूर्व निवडणुका होण्याची शक्यता लक्षात घेऊन निवडणूक आयोग सज्ज झाला आहे. त्यासाठी आयोगाने अतिरिक्त इलेक्ट्रॉनिक्स मतदान यंत्रांची मागणी नोंदविली आहे.
पाच राज्यांच्या निवडणुकांसमवेत लोकसभेच्याही निवडणुका घेण्यात आल्यास त्यासाठी सध्याची इलेक्ट्रॉनिक्स मतदान यंत्रे पुरी पडणार नसल्याचे लक्षात घेऊन आयोगाने सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांकडे दोन लाख यंत्रांची ऑर्डर दिली आहे. सध्या असलेली १४ लाख यंत्रे अपुरी पडतील, असे वाटून आणखी यंत्रांची मागणी नोंदविण्यात आल्याचे आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. एकाच वेळी दोन्ही निवडणुका घेण्यात आल्यास निवडणूक आयोगास १६ लाख यंत्रांची आवश्यकता भासेल.
या वर्षी दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ आणि मिझोराम या राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत.