इंग्लंडच्या राजघराण्याच्या वारसाबाबत जगभरात औत्सुक्य लागूल राहिले आहे. युवराज विल्यम आणि त्याची पत्नी केट मिडलटन यांना मुलगा होणार की मुलगी याबाबत लोकांमध्ये कमालीची उत्कंठा असून त्याची घोषणा करण्यासाठी लंडनमध्ये भव्य पडदा लावण्यात आला आहे. याशिवाय रोषणाई आणि इतर सजावटींचीही जोरदार तयार सुरू आहे.
राजघराण्यातील या नव्या पाहुण्याच्या आगमनाची बातमी टिपण्यासाठी जगभरातील प्रसारमाध्यमांनी आपले सारे लक्ष केंद्रित केले आहे. केटच्या बाळंतपणाची नेमकी तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र जुलैमध्ये बाळ जन्माला येणार असल्याचे प्रसिद्ध करण्यात आले आहे.
राजघराण्यातील या पाहुण्याच्या स्वागतासाठी संपूर्ण इंग्लंड सज्ज झाले असून लंडन प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे.
लंडनमधील प्रसिद्ध ट्रॅफलगर चौकातील भलेमोठी कारंजी सजवण्यात आली असून नवजात बाळ मुलगा की मुलगी हे दर्शवण्यासाठी गुलाबी आणि निळ्या रंगाची रोषणाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच नवजात बाळाला ६२ तोफांची सलामी देण्यात येणार आहे.
१९४८ मध्ये युवराज चार्ल्सच्या जन्मावेळी ट्रॅफलगर चौकातील कारंज्यांमधून रोषणाईची उधळण करण्यात आली होती.
नव्या बाळाची आगमनाची घोषणा करण्यासाठी लंडनमधील ६०० फूट बीटी टॉवरवर भला मोठा पडदा लावण्यात आला आहे. याबाबत बोलताना बीटीचे अधिकारी सुझी विल्यम्स यांनी सांगितले की, २०१२ चे लंडन ऑलिंपिक सुरू होण्याआधी एक हजार दिवस आधीपासूनची उलटमोजणी दाखवण्यासाठी बीटी टॉवरवर मोठा पडदा लावला होता. त्याशिवाय शाही लग्न आणि राणीच्या रौप्यमहोत्सवाच्या वेळीही हा भलामोठा पडदा लावण्यात आला होता.
युवराज विल्यम सध्या नवीन बाळाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत असून त्यासाठी त्याने चक्क पितृत्व रजा घेतली आहे.
‘रॉयल इंडियन’ची भारतीयांमध्ये सर्वाधिक उत्कंठा
इंग्लंडच्या राजघराण्याचा नवीन वारसदार लवकरच जन्माला येणार असून राजकुमार विल्यम आणि केट मिडलटन यांच्या रॉयल बेबीबाबत खुद्द ब्रिटिशांना जेवढी उत्सुकता नाही तेवढी उत्सुकता भारतीयांमध्ये असल्याचे एका सर्वेक्षणाद्वारे समोर आले आहे.
केटच्या पोटी जन्माला येणाऱ्या बाळाबाबत जगभरात औत्सुक्य आहे. त्यामुळे युगोव या संस्थेने याबाबत इंग्लंड, अमेरिका आणि भारतामध्ये लोकांच्या प्रतिक्रिया मागविल्या. ऑनलाइन सर्वेक्षणाद्वारे ५७ टक्के भारतीयांनी आपण रॉयल बेबीच्या आगमनाबाबत अधिक उत्सुक असल्याचे म्हटले आहे. तर खुद्द इंग्लंडमधील जनतेने ४६ टक्के, तर २५ टक्के अमेरिकी नागरिकांनी आपले मत नोंदविले आहे.
इंग्लंडमधील रॉयल कुटुंबाबत इंग्लंडपेक्षा अमेरिकेत अधिक उत्सुकता आहे. मात्र नव्या सर्वेक्षणानुसार भारताने बाजी मारल्याचे दिसून येते.