पाकिस्तानी सैनिकांकडून वारंवार शस्त्रसंधी कराराचे उल्लंघन होत असल्यामुळे भारतीय लष्कर कमालीचे सतर्क झाले आहे. युद्धसदृश परिस्थितीमुळे भारत-पाकिस्तान सीमारेषेवर कमालीचा तणाव वाढला आहे.पाकिस्तानी सीमारेषेवर कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. पाकिस्तानी लष्कराने अनेकदा शस्त्रसंधीचा भंग केला असून नियंत्रण रेषेजवळील दरवाजांजवळ गर्दी केल्यामुळे गुरुवारी तणावात भर पडली होती. मात्र जम्मू आणि काश्मीरमधील नियंत्रण रेषेसह सीमारेषेवरील परिस्थिती नियंत्रणात असून रात्रंदिवस गस्त वाढवण्यात आल्याचे लष्करी अधिकाऱ्याने शुक्रवारी स्पष्ट केले.
पाकिस्तानी लष्कराने भारतीय हद्दीत पूंछ जिल्ह्य़ातील कृष्णघाटी भागात गुरुवारी सायंकाळी ५ ते रात्री ९.३०च्या दरम्यान जोरदार हल्ला केला केला होता. मात्र भारतीय लष्कराने जोरदार प्रत्युत्तर दिले. यावेळी कोणीही जखमी झाले नसल्याचे लष्करी प्रवक्त्याने स्पष्ट केले. दरम्यान,पाकिस्तानकडून सतत होणाऱ्या घुसखोरीच्या पाश्र्वभूमीवर लष्कर आणि सीमा सुरक्षा दलाने जम्मू काश्मीरमधील सीमेवरील आपल्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला.
उभयपक्षी इशारेबाजी
भारत आणि पाकिस्तान सीमेवरचा तणाव कायम असून उभय देशांनी गुरुवारीही परस्परांविरुद्ध सीमेवर गोळीबार झाल्याचे आरोप शुक्रवारी केले व परस्परांना इशारेही दिले. पाकिस्तानने भारताच्या उच्चायुक्तांना पाचारण करून त्यांच्याकडे निषेध नोंदविला.
पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव जलील अब्बास जिलानी यांनी भारताचे उच्चायुक्त शरत् सभरवाल यांना बोलावून घेतले आणि भारताकडून सीमेवर वारंवार, अस्वीकारार्ह आणि चिथावणीखोर गोळीबार सुरू असल्याचा निषेध नोंदविला. या प्रकारांची भारत सरकारने कसून चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली.नवी दिल्लीत परराष्ट्र प्रवक्त्याने सांगितले की, सभरवाल यांनी जिलानी यांची भेट घेऊन १० जानेवारीच्या निर्घृण हल्ल्याबाबतचा निषेध त्यांच्याकडे नोंदविला. मेंधर क्षेत्रात पाकिस्तानकडून चिथावणीखोर गोळीबार सुरू असून त्याला संयमित प्रत्युत्तरादाखल भारताने गोळीबार केल्याचेही सभरवाल यांनी स्पष्ट केले आहे. पाकिस्तानने सिमला कराराचे काटेकोर पालन करावे आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचे पावित्र्य राखावे, असे आवाहनही भारताने या पाश्र्वभूमीवर केले आहे.

आम्ही केलेली चूक आता तुम्ही करू नका!
दोन जवानांची निर्घृण हत्या आणि सीमेवर सुरू असलेला गोळीबार पाहता पाकिस्तानशी सुरू असलेली शांततेसाठीची बोलणी तात्काळ थांबवावीत, अशी मागणी भारतीय जनता पक्षाने शुक्रवारी केली. जोवर तुम्ही आजवरच्या कराराचे पालन करीत नाही तोवर आम्ही चर्चा सुरू करणार नाही, असे पाकिस्तानला ठणकावून सांगावे, अशी मागणी भाजप नेते यशवंत सिन्हा यांनी केली. अर्थात पाकिस्तानबरोबरचे राजनैतिक पातळीवरील संबंध तोडू नये, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. वाजपेयींच्या नेतृत्वाखालील रालोआच्या सरकारनेही पाकिस्तानशी चर्चा सुरू ठेवण्याची चूक केली होती, अशी कबुलीही त्यांनी दिली. पाकिस्तानवर तेथील सरकारचा नव्हे तर अतिरेक्यांचाच अंमल आहे, हे लक्षात न घेता; आपण पाकिस्तानशी गोड गोड बोलू शकतो, या भ्रमात प्रत्येक सरकार पडते. आमच्याकडूनही ती चूक झाली आहे. आता तरी ती निस्तरावी, असे ते म्हणाले.