गेल्या काही दिवसांपासून कोरिया द्वीपकल्पात सुरू असलेला तणाव निवळण्याचे अद्याप कोणतेही संकेत नाहीत. युद्धखोर उत्तर कोरियावर आंतरराष्ट्रीय दबाव वाढावा यासाठी अमेरिका हरतऱ्हेने प्रयत्न करत आहे. मात्र, उत्तर कोरियाने त्याला अद्यापपर्यंत भीक घातलेली नाही. द्वीपकल्पाच्या संपूर्ण टापूत अस्वस्थता भरून राहिली आहे.. शुक्रवारीही त्यात फरक पडला नाही..
चीनच्याच डोक्याला ताण
उत्तर कोरियावर सर्वाधिक प्रभाव चीनचा आहे. मात्र, तेथील नवतरुण नेतृत्व किम जाँग उन चीनलाही जुमानत नाही. त्यामुळे त्यांच्या युद्धखोर पवित्र्याचा ताण अंतिमत चीनच्याच डोक्याला आहे, असे सांगत अमेरिकन सिनेटने चीननेच उत्तर कोरियाला वेसण घालावी असे सूचवले आहे.
अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर संस्थेचे संचालक जेम्स क्लॅपर यांनी सिनेटच्या निवडक समितीसमोर बोलताना कोरिया पेचप्रसंगाच्या सोडवणुकीबद्दल चीनकडे बोट दाखवले.
चीनचा लष्करी सराव
कोरिया द्वीपकल्पात पेचप्रसंग जारी असतानाच चीनने उत्तर कोरियाच्या सीमावर्ती भागात शुक्रवारी जोरदार लष्करी सराव केला. दक्षिण चीनमधील शेनयांग लष्करी तळावरील सैनिकांनी या युद्धसरावात भाग घेतला. रणगाडे आणि चिलखती वाहनांचा या सरावात वापर करण्यात आला. उत्तर कोरियाने कोणतीही आगळीक करू नये असा इशारा यापूर्वीच चीनने दिला आहे. मात्र, तरीही उत्तर कोरियाने आक्रमक धोरण सुरूच ठेवले आहे. या सर्व पाश्र्वभूमीवर चीनच्या लष्कराने केलेला युद्धसराव उल्लेखनीय मानला जात आहे.
पेंटागॉनला भीती
उत्तर कोरियाकडे अण्वस्त्रे असून ते क्षेपणास्त्राच्या साह्य़ाने दक्षिण कोरियावर अण्वस्त्रहल्ला करतील अशी भीती पेंटागॉनने व्यक्त केली आहे. आपल्याकडे असलेल्या माहितीच्या आधारावरच ही भीती व्यक्त करत असल्याचे पेंटागॉनने स्पष्ट केले आहे. सिनेटच्या संरक्षण समितीचे सदस्य व रिपब्लिकन सिनेटर डग लॅम्बॉर्न यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. पेंटागॉनकडे असलेल्या गोपनीय अहवालाच्या आधारेच आपण ही माहिती देत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, उत्तर कोरियाकडे नेमकी किती अण्वस्त्रे आहेत याचा तपशील उपलब्ध नसल्याचे ते म्हणाले.
‘ती’ वेळ आली आहे..
युद्धज्वर वाढवण्यासाठी..
कोरियातील पेचप्रसंगाच्या पाश्र्वभूमीवर जपानने स्वसंरक्षणार्थ पॅट्रियट क्षेपणास्त्र पश्चिम किनारपट्टीवर तैनात केले आहे. उत्तर कोरियाकडून येत असलेल्या धमक्यांच्या पाश्र्वभूमीवर ही क्षेपणास्त्र तैनाती करण्यात आल्याचे जपानी संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले.
जॉन केरी द. कोरियात