चीनने भारताच्या लडाख भागात केलेल्या घुसखोरीबद्दल निषेध व्यक्त करण्यासाठी उभय राष्ट्रांमध्ये ‘फ्लॅग मीटिंग’ घेण्यात येणार असल्याची माहिती परराष्ट्र व्यवहारमंत्री सलमान खुर्शीद यांनी दिली. कोणताही अंतिम निर्णय घेण्यापूर्वी आम्ही सर्व घटनाक्रम समजावून घेत आहोत, असेही खुर्शीद यांनी नमूद केले.
पूर्व लडाखमधील दौलत बेग ओल्डी येथे चीनी सैन्याने घुसखोरी करीत आपली चौकी उभारली होती. भारताच्या हद्दीत चीनी सैन्याने केलेल्या या घुसखोरीबाबत परराष्ट्र व्यवहारमंत्र्यांवर संसदेबाहेर पत्रकारांनी प्रश्नांची सरबत्ती केली.
या प्रश्नांना उत्तरे देताना खुर्शीद म्हणाले की, या प्रश्नाकडे सरकार गांभीर्याने पाहात आहे, मात्र या मुद्दय़ावरील चर्चा एका विशिष्ट चाकोरीत राहणे हिताचे आहे आणि त्या चौकटीत राहूनच या मुद्दय़ावर चीनकडून ‘फ्लॅग मीटिंग’मध्ये त्यांची बाजू आणि स्पष्टीकरण ऐकून घेतले जात आहे, असे खुर्शीद यांनी स्पष्ट केले. लडाख येथील समुद्रसपाटीपासून १७ हजार फूट उंचीवर असलेल्या भारतीय हद्दीत १५ एप्रिलच्या रात्री चीनी सैन्याच्या (पीपल्स रिपब्लिक आर्मी) एका तुकडीने घुसखोरी केली होती.
राष्ट्रीय हितसंबंधांशी तडजोड नाही – अँटोनी
भारतीय हद्दीत चीनच्या सैन्याने घुसखोरी केली असली तरीही भारतीय हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी आवश्यक ते प्रत्येक पाऊल सरकार उचलेल, असा निर्वाळा संरक्षणमंत्री अँटोनींनी दिला.