देशातील मुस्लिमांच्या सर्वात मोठय़ा धार्मिक सभेस (तबलिगी इज्तिमास) शनिवारपासून येथून जवळच असलेल्या इतखेडीमध्ये सुरुवात झाली. या कार्यक्रमाचे हे ६५ वे वर्ष असून यामध्ये सहभागी होण्यासाठी जगभरातील मुस्लीम विचारवंत येथे दाखल झाले आहेत.
या कार्यक्रमाची सुरुवात शनिवारी सकाळी सामुदायिक नमाज पठणाने सुरुवात झाली. या वेळी जागतिक शांततेसाठी अल्लाहकडे साकडे घालण्यात आले, अशी माहिती इजितमाचे प्रवक्ते अतीक-अल-इस्लाम यांनी सांगितले. तीन दिवस चालणाऱ्या या धार्मिक सभेत जगभरातील १० लाखांपेक्षा अधिक भाविक येण्याची शक्यता आहे. बांगलादेश, रशिया, मलेशिया, इंडोनेशिया, तजाकिस्तान, फ्रांस, मोरक्को, इराक यासह २५ देशांतील भाविक या सभेस उपस्थित राहणार असल्याची माहिती इस्लाम यांनी दिली.या परिषदेमध्ये उपस्थित राहणाऱ्यांची वाढती संख्या लक्षात घेता, ३० एकरपेक्षा अधिक जमिनीवर केवळ निवासासाठी राहुटय़ा उभारण्यात येणार आहेत, तर ११० एकर जमीन वाहनतळासाठी राखीव ठेवण्यात आली आहे. सुमारे १० एकर जमिनीवर या सर्व भाविकांची जेवणाची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली.