दोन अनुयायी महिलांवर बलात्कार केल्याप्रकरणी तुरुंगात शिक्षा भोगणाऱ्या स्वयंघोषित धर्मगुरू गुरमीत राम रहीम सिंग याला गुरुवारी ३० दिवसांचा पॅरोल मंजूर करण्यात आला आहे. यावर्षी जानेवारीमध्येही राम रहीमला पॅरोल मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर आता हरियाणा सरकारने पुन्हा एकदा ‘डेरा सच्चा सौदा’चा प्रमुख असणाऱ्या राम रहीमला जामीन मंजूर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पॅरोल आदेशानुसार, गुरमीत राम रहीम सिंग हा पॅरोल कालावधीत उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील शाह सतनाम आश्रमात राहणार आहे. सिरसा येथील आश्रमात दोन महिला अनुयायांवर बलात्कार केल्याप्रकरणी राम रहीम रोहतक येथील तुरुंगात २० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहे. यापूर्वी आजारी आईला भेटण्याच्या कारणासह इतर वेगवेगळ्या कारणांसाठी राम रहीमला पाच वेळा पॅरोलवर तुरुंगातून सोडण्यात आलं आहे.

स्वयंघोषित धर्मगुरू राम रहीमने हरियाणा गूड कंडक्ट प्रिझनर्स (तात्पुरती सुटका) कायदा, २०२२ च्या कलम ३ अंतर्गत पॅरोलसाठी अर्ज केला होता. त्यानंतर त्याला ३० दिवसांचा पॅरोल मंजूर करण्यात आला. अधिकाऱ्यांनी गुरमीत राम रहीम सिंगला पॅरोल कालावधीत ठरवून दिलेल्या ठिकाणी सोडून इतर ठिकाणी जाण्यास मज्जाव केला आहे. तसेच इतरही काही अटी घातल्या आहेत.

महिला अनुयायांवर बलात्कार केल्याप्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाने ऑगस्ट २०१७ मध्ये राम रहीमला दोषी ठरवलं होतं. त्यानंतर २०१९ मध्ये गुरमीत राम रहीम सिंग याला आणि इतर तीन जणांना एका पत्रकाराच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two follower woman rape case 30 days parole granted to gurmeet ram rahim dera sacha sauda chief rmm