परदेशातून मिळालेल्या निधीचा गैरवापर केल्याच्या आरोपावरून सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड आणि त्यांचे पती जावेद आनंद यांना अटक करून त्यांची चौकशी करण्याची परवानगी द्यावी, यासाठी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने सेटलवाड आणि त्यांच्या पतीला दिलेल्या अटकपूर्व जामीनाला सीबीआय सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहे.
‘फॉरेन काँट्रिब्युशन रेग्युलेशन अॅक्ट’मधील तरतुदींचे सेटलवाड यांनी उल्लंघन केले आहे. परदेशातून मिळालेल्या निधीचा त्यांनी गैरवापर केला असून, त्यामुळे सामाजिक सौहार्दतेचे वातावरण धोक्यात आले आहे, असा आरोप सीबीआयने केला असून, त्यासाठी आवश्यक पुरावेही या संस्थेने जमविले आहेत. सकृतदर्शनी हे दोघेही दोषी असल्याचे दिसून येत असल्यामुळेच त्यांचा अटकपूर्व जामीन रद्द करण्याची मागणी करण्यात येणार आहे.
केंद्राकडून आवश्यक असलेली मान्यता न घेताच सेटलवाड यांच्या ‘सबरंग कम्युनिकेशन अॅण्ड पब्लिशिंग प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीने अमेरिकेतील फोर्ड फाऊंडेशनकडून १.८ कोटी रुपयांचा निधी गोळा केला, असे सीबीआयचे म्हणणे आहे. सेटलवाड आणि त्यांच्या पतीने हे सर्व आरोप फेटाळले आहेत. गुजरात दंगलीतील पीडितांची बाजू घेतल्यानेच आपल्याला लक्ष्य करण्यात येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 25th Sep 2015 रोजी प्रकाशित
तिस्ता सेटलवाड यांच्या अटकेसाठी सीबीआयची सर्वोच्च न्यायालयात धाव
मुंबई उच्च न्यायालयाने सेटलवाड आणि त्यांच्या पतीला दिलेल्या अटकपूर्व जामीनाला सीबीआय सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहे
Written by विश्वनाथ गरुड
First published on: 25-09-2015 at 15:49 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Violation case cbi moves sc for teesta setalvads custody