Divorce Case at Delhi High Court: २१ डिसेंबरला दिल्ली उच्च न्यायालयाने एका खटल्यातील सुनावणीदरम्यान, आपण जिवंत असताना आपल्याच पत्नीने विधवा म्हणून वागताना पाहण्यासारखा कोणताही त्रासदायक अनुभव असू शकत नाही आणि असे वर्तन अत्यंत क्रूरतेचे आहे असे म्हटले आहे. जर एक जोडीदार दुसऱ्याला वैवाहिक संबंधांपासून वंचित ठेवत असेल तर असा विवाह टिकू शकत नाही आणि असे करणे देखील क्रूरतेचे कृत्य आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने कौटुंबिक न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणार्‍या महिलेची याचिका फेटाळून तिच्या पतीच्या बाजूने घटस्फोटाचा हुकूम मंजूर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

घटस्फोटासाठी पती- पत्नीचे दावे काय?

प्राप्त माहितीनुसार, या जोडप्याचे एप्रिल २००९ मध्ये लग्न झाले होते आणि ऑक्टोबर २०११ मध्ये त्यांनी एका मुलीला जन्म दिला होता. या महिलेने प्रसूतीच्या काही दिवस आधी तिचे सासरचे घर सोडले होते. यानंतर महिलेच्या पतीने कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाची याचिका दाखल करत असा दावा केला होता की त्यांचे लग्न झाल्यापासूनच त्याची पत्नी त्याच्याबद्दल उदासीन आहे. बाळ होण्याच्या आधी निघून गेल्यावर ती तब्बल १४७ दिवस परत आली नव्हती. तिला तिच्या वैवाहिक जबाबदारीमध्ये कोणताही रस नाही. घरातील कामांमध्ये सुद्धा तिने कधीच जबाबदारी स्वीकारली नाही, घरी जेवणही ती वडिलांना बनवण्यास भाग पाडायची.

त्याने असाही दावा केला की त्याची पत्नी किरकोळ विषयांवर चिडायची आणि कुटुंबाशी भांडण करायची आणि एकदा तिने ‘करवाचौथ’ उपवास ठेवण्यास नकार दिला कारण पतीने तिचा मोबाइल फोन रिचार्ज केला नाही. एप्रिल २०११ मधील दुसर्‍या एका घटनेचा संदर्भ देताना, पती म्हणाला की , जेव्हा त्याला स्लिप डिस्क होती, तेव्हा त्याच्या पत्नीने त्याची काळजी घेण्याऐवजी तिच्या कपाळावरील कुंकू पुसून टाकले, तिच्या बांगड्या फोडल्या आणि पांढरे कपडे घालून स्वतःलाच विधवा घोषित केले.

दुसरीकडे, महिलेने पतीचे आरोप फेटाळले आणि दावा केला की तिच्या पतीनेच तिला तिच्या पालकांच्या घरी जाण्यास प्रोत्साहित केले होते जिथून ती २ ते ३ दिवसातच परतली होती.

उच्च न्यायालयाने काय निर्णय दिला?

खंडपीठाने स्पष्ट केले की ‘करवाचौथ’ ला उपवास करणे किंवा न करणे ही वैयक्तिक निवड असू शकते आणि त्याला क्रूरतेचे कृत्य म्हटले जाऊ शकत नाही. भिन्न धार्मिक श्रद्धा असणे आणि काही धार्मिक कर्तव्ये न पाळणे हे क्रौर्य नाही आणि वैवाहिक संबंध तोडण्यासाठी पुरेसे नाही. मात्र, पत्नीच्या वर्तणुकीशी आणि सध्याच्या प्रकरणात पतीने सिद्ध केलेल्या परिस्थितीनुसार, हे सिद्ध केले होते की हिंदू संस्कृतीतील प्रचलित रीतिरिवाजांचे पालन न करणे व वैवाहिक बंधनाबद्दल आदर न दाखवणे यातून पत्नीची नाते जपण्याची इच्छा नव्हती हे सिद्ध होते.

पीटीआयच्या वृत्तानुसार, सदर प्रकरणात न्यायमूर्ती सुरेश कुमार कैत आणि नीना बन्सल कृष्णा यांच्या खंडपीठाने म्हटले की, “पतीला त्याच्या हयातीत पत्नीला विधवा म्हणून वावरताना पाहण्याइतका दु:खदायक अनुभव कोणताही असू शकत नाही, ते सुद्धा अशा परिस्थितीत जेव्हा तो (पती) गंभीर जखमी झाला असून त्याची पत्नीकडून काळजी व सहानुभूतीशिवाय इतर कोणतीही अपेक्षा नाही. (अपीलकर्ता) पत्नीच्या अशा वर्तनाला (प्रतिवादी) पतीबद्दल अत्यंत क्रूरतेचे कृत्य म्हणता येईल.”

हे ही वाचा<< कुलदेवता म्हणून पूजलेला गोळा निघाला डायनासॉरचं अंडं; पण हे कळलं कसं? तज्ज्ञ म्हणाले, “या नदीच्या खोऱ्यात..”

अंतिम निकाल देताना खंडपीठाने पुढे म्हटले की, पुराव्यांवरून हे सिद्ध झाले आहे की या पती- पत्नीचा वाद मिटण्याची शक्यता नाही त्यात इतका प्रदीर्घ कालावधी खोटे आरोप, पोलिस अहवाल आणि फौजदारी खटला हे सगळं सहन करावे लागणे हे मानसिक क्रूरतेचे लक्षण आहे. कोणत्याही वैवाहिक नात्याचा पाया म्हणजे सहवास आणि वैवाहिक संबंध मात्र या जोडप्यातील वैवाहिक कलहामुळे विश्वास, समजूतदारपणा, प्रेम आणि आपुलकी पूर्णपणे नष्ट झाली आहे. या नातेसंबंधात कुरघोडी, मतभेद आणि प्रदीर्घ खटले याचेच अस्तित्व शिल्लक आहे अशात हे नाते कायम ठेवण्याचा कोणताही आग्रह दोघांसाठी अन्यायकारक ठरू शकतो.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wife acting as widow when husband is alive is harrowing declares high court in trending divorce case over wife refusing vrat svs