देशात घडणाऱया अत्याचाराच्या घटनांवर केंद्र सरकार व साहित्य अकादमीने बाळगलेल्या मौनाविरोधात शुक्रवारी साहित्यिक रस्त्यावर उतरले. साहित्यिकांनी दिल्लीच्या रस्त्यावर ‘शोक मौन’ मोर्चा काढला. दादरी, एम.एम.कलबुर्गी, पानसरे हत्याकांड तसेच गुलाम अली प्रकरणावरून साहित्यिक वर्तुळात मोठ्या प्रमाणावर अस्वस्थता आहे. अनेक साहित्यिकांनी त्यांना मिळालेले साहित्य अकादमीचे पुरस्कार देखील परत केले आहेत. देशात वाढत्या असहिष्णुतेविरोधात साहित्यिकांची सर्वोच्च संस्था असलेल्या साहित्य अकादमीने अद्याप निषेधाचा ब्र सुद्धा काढलेला नाही, असा नाराजीचा सूर घेत साहित्यिकांनी आज हातात निषेधाचे फलक घेऊन मौन मोर्चाचे आयोजन केले. साहित्यिकांची पुरस्कारवापसी व अकादमीच्या सदस्यांच्या राजीनामा सत्रावर चर्चा करण्यासाठी आज अकादमीची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर साहित्यिकांनी तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून साहित्य अकादमीच्या कार्यालयावर मोर्चा काढला. साहित्यिकांच्या हातात सरकारविरोधी व अकादमीचा निषेध व्यक्त करणारे फलक होते. दरम्यान, साहित्य अकादमीच्या आजच्या बैठकीत नेमका काय निर्णय घेतला जातो याकडे देखील साऱयांचे लक्ष लागून राहिले आहे.