7 Forgotten Places on World Map with Strongest History: जगात अनेक नयनरम्य पर्यटनस्थळं आहेत. परंतु, काही अत्यंत महत्त्वाची ऐतिहासिक ठिकाणं मात्र अनेकदा दुर्लक्षितच राहतात. या ठिकाणांचा उल्लेख पर्यटनाच्या मुख्य प्रवाहात फारसा होत नाही. असं असलं तरी या स्थळांचा सांस्कृतिक ठसा, क्रांतीचा वारसा आणि मानवी अस्तित्वासाठीचा संघर्ष खोलवर रुजलेला असतो. सेल्फीपेक्षा इतिहास अधिक महत्त्वाचा मानणाऱ्या प्रवाशांसाठी जगभरातील ७ अशा दुर्लक्षित स्थळांविषयी जाणून घेणं महत्त्वाचं ठरणारं आहे.
अनी, तुर्कीये : कधीकाळी बलशाली असलेल्या साम्राज्याची राजधानी (Ani, Türkiye: Ghost Capital of a Medieval Empire)
मध्ययुगीन आर्मेनियन साम्राज्याची समृद्ध राजधानी असलेलं हे शहर “१००१ चर्चेसचं शहर” म्हणून ओळखलं जात होतं. आक्रमणं आणि भूकंपानंतर ते पूर्णपणे ओस पडलं आणि आता तुर्कस्तान-आर्मेनिया सीमारेषेवर त्याचे रहस्यमय अवशेष भग्न अवस्थेत आहेत. एकेकाळी कॉन्स्टँटिनोपोलला टक्कर देणारं हे भव्य शहर अनुभवणं म्हणजे एक विलक्षण असा अनुभव आहे. १० व्या ते १३ व्या शतकात याची कीर्ती जगभर होती. या शहराची तुलना थेट कॉन्स्टँटिनोपोलशी केली जात असे. येथे उत्तम कोरीवकाम केलेली चर्चेस, राजवाडे आणि प्रसिद्ध व्यापारी मार्ग होते. हे शहर प्राचीन रेशीम मार्गाशी जोडले गेले होते.
परंतु आक्रमणं, राजकीय संघर्ष आणि नंतर आलेल्या भूकंपांनी हे भव्य शहर उद्ध्वस्त केलं. आज, तुर्कस्तान-आर्मेनिया सीमारेषेवर, याचं अस्तित्व केवळ भग्नावस्थेतील अवशेषांत उरलं आहे. अनीची वाळवंटासारखी शांतता आणि त्यात दडलेली ऐतिहासिक गुंतागुंत अनुभवणं म्हणजे इतिहासाच्या वाळवंटात हरवलेली एक अद्भुत यात्रा आहे.
ग्रेट झिम्बाबे, झिम्बाबे: विस्मरणात गेलेलं दगडी नगर (Great Zimbabwe, Zimbabwe: Stone Metropolis of Gold)
११ व्या ते १५ व्या शतकांदरम्यान, ग्रेट झिम्बाबे हे दक्षिण आफ्रिकेतील एका शक्तिशाली साम्राज्याची राजधानी होतं. ते सोन्याच्या व्यापारावर आणि प्रगत राजकीय व्यवस्थेवर समृद्ध झालं होतं. या शहरातील दगडी वास्तू, चुना किंवा सिमेंटशिवाय बांधलेल्या असूनही, आजही उभ्या आहेत. त्या काळातील स्थापत्यशास्त्र, तंत्रज्ञान आणि नागरी नियोजन याचं हे एक अद्वितीय उदाहरण आहे.
सहस्रावधी दगड रचून उभारलेल्या प्राचीन भिंती आणि राजवाड्यांचे अवशेष सांगून जातात की, आफ्रिकेचा इतिहास केवळ वसाहतवादी कालखंडापासून सुरू होत नाही. ग्रेट झिम्बाबे हे त्या ऐतिहासिक अध्यायाचं मूर्त स्वरूप आहे. ही जागा पाहणं म्हणजे इतिहासाच्या पानांमध्ये नोंद न झालेल्या एका संपन्न आणि अभिमानास्पद संस्कृतीची साक्ष मिळवणं आहे.
नॅन माडोल, मायक्रोनेशिया: पॅसिफिकमधील व्हेनिस (Nan Madol, Micronesia: Venice of the Pacific)
नॅन माडोल हे मानवनिर्मित बेटांच्या साखळीवर वसलेलं एक अनोखं शहर होतं, जे सॉउडेलॉर राजवंशाची धार्मिक राजधानी म्हणून ओळखलं जातं. इथे भव्य बेसाल्ट दगडांपासून ८ व्या शतकात उभारलेली वास्तुकला आणि अत्यंत प्रगत अशा कालवा प्रणालीचे पुरावे आढळतात.
द्वारका, भारत: पुराणांतील हरवलेली जलनगरी (Dwarka, India: Mythic Sunken Kingdom of Krishna)
हिंदू पुराणांनुसार द्वारका हे भगवान श्रीकृष्णाचं अलौकिक आणि समृद्ध राज्य होतं. आज गुजरातच्या किनाऱ्यावर आणि समुद्रतळाशी सापडलेले पुरातत्त्वीय अवशेष या पुराणकथेचं वास्तवाशी असलेलं नातं अधोरेखित करतात. समुद्रात बुडालेल्या प्राचीन वास्तू आणि संरचना या शहराच्या गूढतेला अधिकच भर घालतात. येथे पुराणकथांचा इतिहास, समुद्राखालचं पुरातत्त्वीय संशोधन आणि कृष्णभक्तांची श्रद्धा सगळं एका ठिकाणी अनुभवता येतं.
टिकाल, ग्वाटेमाला: माया संस्कृतीची हरवलेली गूढ नगरी (Tikal, Guatemala: Jungle Citadel of the Maya)
दाट जंगलाच्या हिरवाईत लपलेलं टिकाल हे माया संस्कृतीचं एक महान आणि ऐतिहासिक शहर होतं. येथील उंचच उंच मंदिरे आणि पिरॅमिड्स झाडांच्या शेंड्यांनाही मागे टाकतात आणि त्या माया खगोलशास्त्र, धार्मिक विधी आणि युद्धांच्या कहाण्या आजही सांगत राहतात. इथलं गूढ, थरारक शांत वातावरण आणि प्राचीन माया संस्कृतीशी असलेला थेट संबंध, हे सर्व भूतकाळाशी जणू संवाद घडवतात.
लेप्टिस मॅग्ना, लिबिया: रोमचं विस्मरणात गेलेलं शहर (Leptis Magna, Libya: Rome’s Forgotten African Jewel)
इटलीच्या बाहेरचं सर्वांत भव्य रोमन शहर म्हणून ओळखलं जाणारं लेप्टिस मॅग्ना, सम्राट सेप्टीमियस सेव्हेरसच्या काळात आपल्या वैभवशिखरावर होतं. भूमध्य समुद्रकिनाऱ्यावर वसलेलं हे शहर आजही अनेक ठिकाणी सुस्थितीत आहे. या भागातील राजकीय अस्थिरतेमुळे पर्यटकांची मर्यादित वर्दळ हे एक कारण मानलं जातं.
खांबांनी सजलेले राजमार्ग, प्राचीन नाट्यगृहं, बृहद बाजारपेठा आणि रोमन अभिजात स्थापत्यशैली हे सर्व तुम्ही शांततेत, गर्दीपासून दूर अनुभवू शकता.
लेप्टिस मॅग्नासारखी शहरं केवळ दगडधोंड्यांची रचना नसतात, तर ती इतिहासाच्या पायऱ्यांवर कोरलेली मानवी संस्कृतीची साक्ष असतात. विस्मरणात गेलेल्या या वारशांकडे पुन्हा एकदा पाहणं ही आपल्या सांस्कृतिक जाणीवेची जबाबदारी आहे.
डेरीनकुयू, तुर्कीये (Derinkuyu, Türkiye: 20-Level Underground Refuge)
कप्पाडोशियामधील हे भूमिगत शहर सुमारे २०,००० लोकांचं निवासस्थान होतं. येथे बोगदे, विहिरी, चर्चेस आणि हवा खेचणाऱ्या नळ्यांचं जाळं आहे. बायझंटाईन काळापासून आक्रमणांपासून संरक्षण मिळवण्यासाठी ही जागा आश्रयस्थाने म्हणून वापरली जात होती.
डेरीनकुयूचं भूमिगत जग म्हणजे माणसाच्या संकटात टिकून राहण्याच्या बुद्धिमत्तेचा आणि स्थापत्यकलेच्या अफाट क्षमतेचा अनोखा संगम आहे. जमिनीखालच्या या गूढ वास्तूतून डोकावलं, तर भूतकाळ केवळ इतिहास म्हणून नव्हे, तर अनुभव म्हणून समोर उभा राहतो.
ही हरवलेली ठिकाणं केवळ गवताने झाकलेले भग्नावशेष नाहीत, तर त्या आपली ओळख घडवणाऱ्या प्राचीन संस्कृतींच्या जिवंत आठवणी आहेत. जिज्ञासू प्रवाशांसाठी ही स्थळं एक अनोखं पर्वणीच ठरतात.
या विस्मरणात गेलेल्या ऐतिहासिक स्थळांकडे केवळ प्राचीन अवशेष म्हणून न पाहता, त्या काळातील मानवी जिद्द, सर्जनशीलता आणि संस्कृतीचे जगावेगळे पैलू म्हणून पाहण्याची गरज आहे. ही ठिकाणं आपल्याला इतिहासाशी फक्त जोडत नाहीत, तर वर्तमान आणि भविष्य यांच्याही अर्थाला नवी दिशा देतात.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
प्र.१ – जगातील काही विस्मरणात गेलेली ऐतिहासिक ठिकाणं कोणती?
उ. अनी (तुर्कीये), ग्रेट झिम्बाबे (झिम्बाबे), नॅन माडोल (मायक्रोनेशिया), द्वारका (भारत), टिकाल (ग्वाटेमाला), लेप्टिस मॅग्ना (लिबिया) आणि डेरीनकुयू (तुर्कीये) ही काही महत्त्वाची परंतु दुर्लक्षित ठिकाणं आहेत. परंतु, इतिहासदृष्ट्या अत्यंत समृद्ध आहेत.
प्र.२ – ग्रेट झिम्बाबे ऐतिहासिकदृष्ट्या इतकं महत्त्वाचं का आहे?
उ. ग्रेट झिम्बाबे हे ११ व्या ते १५ व्या शतकात एका शक्तिशाली साम्राज्याच्या राजधानीच शहर होतं. येथे चुना न वापरता बांधलेल्या भव्य दगडी भिंती व स्थापत्यकलेचं अफाट उदाहरण पाहायला मिळतं.
प्र.३ – द्वारका खरोखर अस्तित्वात होती की ती केवळ पुराणकथा आहे?
उ. गुजरातच्या किनाऱ्याजवळ समुद्राखाली सापडलेले अवशेष हे द्वारकेच्या अस्तित्वाचा पुरातत्त्वीय पुरावा देतात आणि पुराणकथांशी ऐतिहासिक नातंही दर्शवतात.
प्र.४ – डेरीनकुयू हे तुर्कीयेतील शहर इतकं खास का मानलं जातं?
उ. हे एक विशाल भूमिगत शहर आहे, या शहरात कधी काळी २०,००० लोक राहू शकत होते.
प्र.५ – नॅन माडोल खरंच मानवनिर्मित आहे का?
उ. होय. मायक्रोनेशियामध्ये सुमारे ९० मानवनिर्मित बेटांवर हे शहर वसलं आहे. बेसाल्ट दगडांपासून उभारलेल्या या ठिकाणाला “पॅसिफिकमधील व्हेनिस” असंही म्हटलं जातं.