FIFA World Cup 2022 Who Will Challenge France print exp 0322 scsg 91 | Loksatta

विश्लेषण : ‘फिफा’ विश्वचषक ‘ड्रॉ’… गतविजेत्या फ्रान्सपुढे कोणत्या संघांचे आव्हान?

यंदाच्या विश्वचषकात ३२ संघांचा समावेश असला, तरी अजून २९ संघच या स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.

विश्लेषण : ‘फिफा’ विश्वचषक ‘ड्रॉ’… गतविजेत्या फ्रान्सपुढे कोणत्या संघांचे आव्हान?
२१ नोव्हेंबर ते १८ डिसेंबर या कालावधीत विश्वचषक स्पर्धा खेळवली जाणार (फाइल फोटो रॉयटर्सवरुन साभार)

– अन्वय सावंत

जगातील सर्वांत लोकप्रिय खेळ फुटबॉलमधील सर्वांत लोकप्रिय स्पर्धा ‘फिफा’ विश्वचषकाला आता काही महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. यंदा कतार येथे २१ नोव्हेंबर ते १८ डिसेंबर या कालावधीत विश्वचषक स्पर्धा खेळवली जाणार असून पात्रतेचे निकष पूर्ण करणाऱ्या जगभरातील सर्वोत्तम ३२ संघांचा या स्पर्धेत समावेश असेल. आता या संघांची गटवारी कशी असणार, कोणता संघ कोणत्या संघांविरुद्ध साखळी सामने खेळणार, गतविजेत्या फ्रान्सपुढे कोणत्या संघांचे आव्हान असणार, याची चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. ‘फिफा’ विश्वचषकाची कार्यक्रमपत्रिका किंवा ‘ड्रॉ’ शुक्रवारी (१ एप्रिल) जाहीर होणार असल्याने चाहत्यांना लवकरच त्यांच्या या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत.  

आतापर्यंत किती संघ पात्र?

यंदाच्या विश्वचषकात ३२ संघांचा समावेश असला, तरी अजून २९ संघच या स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. करोना प्रादुर्भाव आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे विश्वचषक पात्रता प्रक्रियेला विलंब झाला. १३ किंवा १४ जूनला कतारमध्ये आंतरखंडीय पात्रता फेरी (यातून दोन संघ पात्र), तसेच जूनमध्येच ‘युएफा’ची बाद फेरी (यातून एक संघ पात्र) झाल्यानंतरच विश्वचषकात खेळणारे अंतिम ३२ संघ स्पष्ट होतील.

कार्यक्रमपत्रिकेसाठी कोणते संघ कोणत्या विभागात?

शुक्रवारी होणाऱ्या कार्यक्रमात एकूण ३७ देशांचा सहभाग असेल. जागतिक क्रमवारीनुसार संघांना कार्यक्रमपत्रिकेतील विभागांमध्ये (याला पॉट असेही संबोधतात) स्थान दिले जाणार आहे. कतारचा संघ सध्या जागतिक क्रमवारीत ५२व्या स्थानी असला, तरी त्यांना यजमान या नात्याने ‘विभाग १’मध्ये स्थान दिले जाईल.

विभाग १ : कतार (यजमान), ब्राझील, बेल्जियम, फ्रान्स, अर्जेटिना, इंग्लंड, स्पेन, पोर्तुगाल.

विभाग २ : अमेरिका, क्रोएशिया, डेन्मार्क, जर्मनी, हॉलंड, स्वित्झर्लंड, उरुग्वे आणि मेक्सिको.

विभाग ३ : सेनेगल, जपान, इराण, सर्बिया, मोरोक्को, दक्षिण कोरिया, पोलंड, ट्युनिशिया.

विभाग ४ : कॅनडा, कॅमेरून, इक्वेडोर, सौदी अरेबिया, घाना, पेरू/ऑस्ट्रेलिया/संयुक्त अरब अमिराती, कोस्टा रिका/न्यूझीलंड, वेल्स/स्कॉटलंड/युक्रेन.

या विभागांचे प्रयोजन काय?

एकाच विभागांमधील दोन संघ परस्परांशी गटसाखळीत खेळू शकत नाहीत. त्यामुळे ड्रॉ जाहीर होताना विभाग १च्या काचेच्या भांड्यातून एखाद्या संघाची चिठ्ठी काढली जाते. उदा. अ गटासाठी पहिली चिठ्ठी कतार असेल, तर त्या गटात विभाग १ मधील इतर संघ खेळू शकत नाहीत. चार संघांचा एक गट असल्यामुळे पुढे विभाग क्र. २,३,४ अशा क्रमाने चिठ्ठ्या काढल्या जातात नि एक गट पूर्ण होतो. हीच पद्धत पुढे अ, ब, क, ड, ई, फ, ग, ह गटांसाठी वापरली जाते. 

एकाच खंडातील संघ एकाच गटात येऊ शकतील का?

विश्वचषकात ३२ संघांना आठ गटांमध्ये विभागले जाणार आहे. एकाच खंडातून (आशिया, युरोप, दक्षिण अमेरिका) पात्र ठरणाऱ्या संघांचा विश्वचषकात एकाच गटात समावेश असू नये यासाठी ‘फिफा’ प्रयत्नशील असते. उदा. ब्राझील, अर्जेंटिना, उरुग्वे आदी दक्षिण अमेरिकन संघ विश्वचषकात एकाच गटात असू नयेत याला ‘फिफा’चे प्राधान्य असते. मात्र, युरोपमधून १३ संघ विश्वचषकासाठी पात्र ठरणार असल्याने या सर्व संघांना वेगवेगळ्या गटात विभागणे शक्य नाही.

रशियाचा संघ विश्वचषकात सहभागी असेल का?

रशियाने ‘फिफा’ विश्वचषक पात्रतेच्या बाद फेरीत प्रवेश मिळवला होता. मात्र, युक्रेनवर केलेल्या आक्रमणानंतर ‘फिफा’ने ८ मार्च रोजी रशियावर बंदी घालत विश्वचषक पात्रतेच्या लढतीमध्ये पोलंडला पुढे चाल देण्याचा निर्णय घेतला. ‘फिफा’ने घातलेली ही बंदी उठवून पोलंडविरुद्धचा सामना खेळण्याची संधी देण्याची विनंती रशियन फुटबॉल महासंघाने क्रीडा लवादाकडे केली. मात्र, क्रीडा लवादाने तीन वेळा त्यांची याचिका फेटाळून लावली. त्यामुळे रशियाचा संघ यंदाच्या विश्वचषकात खेळू शकणार नाही. मागील वर्षी रशियात झालेल्या विश्वचषकात यजमानांनी दमदार कामगिरी करताना बाद फेरी गाठली होती.

‘ग्रुप ऑफ डेथ’ म्हणजे काय?

विश्वचषक ड्रॉ चे सर्वांत मोठे आकर्षण ग्रुप ऑफ डेथमध्ये कोणते संघ जाणार, हेच असते. विभागवार पॉट पद्धत आणि क्रमवारीतील असमतोल किंवा असंबद्धता यांमुळे अनेकदा एकाच गटात तीन किंवा चार तुल्यबळ संघ येऊ शकतात. त्यालाच ग्रुप ऑफ डेथ असे संबोधले जाते. विश्वचषक स्पर्धेच्या रचनेत प्रत्येक गटातून दोनच संघ बाद फेरीत जात असल्यामुळे एखाद्या बलाढ् संघाला साखळी टप्प्यातच गाशा गुंडाळावा लागल्याची अनेक उदाहरणे यापूर्वी घडलेली आहेत. 

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-03-2022 at 18:05 IST
Next Story
विश्लेषण : महाराष्ट्र साखर उत्पादनात देशात आघाडीवर?