अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ५० टक्के अतिरिक्त टॅरिफच्या आकारणीला चीनने खऱ्या अर्थाने जशास तसे उत्तर देत अवघ्या २४ तासांमध्ये अमेरिकी मालावरही अतिरिक्त ५० टक्के टॅरिफ आकारण्याची घोषणा केली. अमेरिका आणि चीन या जगातील पहिल्या दोन क्रमांकांच्या अर्थव्यवस्था. पण चीन हा जगातील सर्वांत मोठा वस्तुनिर्माता, तर अमेरिका ही सर्वांत मोठी बाजारपेठ. चिनी मालाच्या किमती दुपटीने वाढवणे अमेरिकेसाठी सोपी बाब नाही. तर अमेरिकेसारखी मोठी बाजारपेठ गमावणे चीनसाठीही तितके सोपे नाही. पण मुळात अमेरिकेसारख्या आद्य औद्योगिक, प्रगत आणि श्रीमंत देशाला भिडण्याची क्षमता आशियाई, नवश्रीमंत देशामध्ये आली कशी, या प्रश्नाचा धांडोळा घेणे रंजक ठरेल.  टॅरिफ विरुद्ध टॅरिफ : पहिल्यांदा अमेरिकेचे अध्यक्ष बनल्यानंतरही ट्रम्प यांनी चीनवर मोठ्या प्रमाणात टॅरिफ लादले होते. त्यावेळी चीनने तितके कठोर प्रत्युत्तर दिले नव्हते. पण जो बायडेन अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनीही ट्रम्प यांच्या कार्यकाळातील अनेक बंधने आणि शुल्के कायम ठेवली. पण दुसऱ्या कार्यकाळात मात्र ट्रम्प विशेषतः चीनच्या बाबतीत आक्रमक व्यापार धोरण अंगिकारणार हे दिसत होतेच. तरीदेखील त्यांनी चीनवर प्रथम आकारलेले २० टक्के प्राथमिक टॅरिफ, त्यात ३४ टक्क्यांची भर घालून निश्चित केलेले ५४ टक्के टॅरिफ आणि चीनच्या आक्रमक प्रत्युत्तरामुळे बिथरून जाऊन आणखी ५० टक्क्यांची भर घालत १०४ टक्के टॅरिफ आकारणीची घोषणा कोणत्याही आर्थिक शहाणपणाच्या पलीकडची ठरते. चीनने सुरुवातीस अमेरिकेवर ३४ टक्के टॅरिफची घोषणा केली. पण अमेरिकेने १०४ टक्के टॅरिफची घोषणा करताच चीननेही ३४ अधिक ५० अशी ८४ टक्के टॅरिफची घोषणा केली. त्यावर ट्रम्प यांनी नव्याने भर घालत १२५ टक्के टॅरिफ चिनी मालावर आकारण्याची घोषणा ९ एप्रिल रोजी रात्री उशिरा केली. इतर देशांबाबत रेसिप्रोकल टॅरिफला ९० दिवसांचा विराम देताना ट्रम्प यांनी चीनबाबत मात्र धोरण बदललेले नाही. 

या बातमीसह विशेष लेख आणि इतर दर्जेदार मजकूर मोफत वाचा

दोन्ही देशांतील व्यापार किती?

गेल्या वर्षी दोन्ही देशांत मिळून एकूण ५८५ अब्ज डॉलरचा व्यापार झाला. पण यात अमेरिकेतून चीनमध्ये होणाऱ्या निर्यातीचे मूल्य १४५ अब्ज डॉलर इतके आहे. याउलट चीनकडून अमेरिकेला होणारीचे निर्यातीचे मूल्य ४४० अब्ज डॉलर इतके आहे. म्हणजे २९५ अब्ज डॉलरचे आधिक्य (सरप्लस) चीनकडे आहे. तितकीच तूट (डेफिसिट) अमेरिकेकडे आहे. अर्थात ट्रम्प म्हणतात तितकी १ लाख कोटी डॉलरची ही तफावत नाही. तरीदेखील २९५ अब्ज डॉलर हा आकडा मोठा असून, अमेरिकेच्या एकूण अर्थव्यवस्थेच्या हे प्रमाण १ टक्का इतके आहे. ट्रम्प यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात लावलेल्या टॅरिफमुळे अमेरिकेत होणाऱ्या चिनी आयातीचे प्रमाण जे २०१६मध्ये २१ टक्के होते, ते गेल्या वर्षी १३ टक्क्यांवर आले. त्यामुळे चीन नव्हे, तर युरोपिय समुदायाकडून अमेरिकेत आता सर्वाधिक आयात होते. शिवाय चिनी मालावर टॅरिफ आकारले जात असले, तरी चीनने त्याच वस्तू आग्नेय आशियातील देशांमध्ये उदा. थायलँड, व्हिएतनाम, मलेशिया तया करून अमेरिकेस पाठवायला सुरुवात केली. उदा. सोलार पॅनेल. त्यामुळेच चीनप्रमाणेच या बहुतेक देशांवरही ट्रम्प प्रशासनाने भरभक्कम शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला. 

दोन्ही देशांत कशाचा व्यापार चालतो?

अमेरिकेतून चीनमध्ये सर्वाधिक निर्यात सोयाबिनची होते. ते प्राधान्याने तेथील डुकरांसाठी खाद्य म्हणून पाठवले जाते. याशिवाय तयार औषधे, पेट्रोलियम, विमानांची इंजिन्स हेही अमेरिकेकडून चीनकडे जाते. तर चीनकडून अमेरिकेत खेळणी, कम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू (प्राधान्याने स्मार्टफोन्स), विविध प्रकारचे विद्युतघट (बॅटरीज) यांची निर्यात होते. स्मार्टफोन्सचे प्रमाण एकूण निर्यातीमध्ये सर्वाधिक म्हणजे ९ टक्के इतके आहे. यातील सर्वाधिक अॅपल कंपनीसाठी बनवले जातात हे विशेष. 

चीनची सरशी?

चिनी वस्तूंवर एक नजर टाकल्यास लक्षात येते, की या वस्तूंचा अमेरिकेतील ग्राहक प्रामुख्याने मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय आहे. या वर्गासाठी मूळ २० टक्के टॅरिफच संबंधित वस्तू महाग करणारे ठरणार होते. आता १२५ टक्के टॅरिफमुळे त्यांची किंमत पाच पट वाढू शकते. याउलट सोयाबिनसारख्या शेतीमालाची आयात चीन इतर कोणत्या तरी देशाकडून करू शकतो. अमेरिकेत ईव्ही मोटारींचे आकर्षण जबरदस्त आहे. पण त्यांच्यासाठी बॅटरी पुरवणारा सर्वांत मोठा देश चीनच आहे. तेथील बॅटऱ्यांवर शुल्क आकारल्याने त्या महागणार नि ईव्ही मोटारीही कडाडणार हा साधा हिशेब आहे. चीनकडे जगातील सर्वाधिक दुर्मिळ संयुगे (रेअर अर्थ) सापडतात. ही संयुगे, तसेच इतर खनिजे इलेक्ट्रॉनिक्स, ग्रीन एनर्जी, लष्करी सामग्री, उपग्रह तंत्रज्ञान आदींसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. चीनकडून तो पुरवठा थांबला तर अमेरिकेकडे सक्षम पर्याय उपलब्ध नाही. ग्रीनलँडवर ताबा मिळवण्याचे प्रयत्न यासाठीच सुरू आहेत. पण ते इतके सोपे नाही. त्यामुळेच सध्या तरी अफाट उत्पादन क्षमतेच्या जोरावर अमेरिकेसमोर चीन शड्डू ठोकून उभा राहू शकतो.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How capable is china of confronting the us in a tariff war print exp ssb