कर्करोगावर कोणतीही लस आतापर्यंत उपलब्ध नसल्याने उपचाराला अनेक मर्यादा येतात. आता कर्करोगावर एक लस विकसित करण्यात आली असून, ती प्रभावी ठरत असल्याचे प्राथमिक वैद्यकीय चाचण्यांतून समोर आले आहे. यामुळे कर्करुग्णांसाठी आशेचा किरण निर्माण झाला आहे. एमआरएनए तंत्रज्ञानावर आधारित ही लस करोनावरील लशीसारखीच आहे. त्यात शरीरातील प्रतिकारशक्तीला कर्करोगग्रस्त पेशींना लक्ष्य करून नष्ट करण्यास प्रशिक्षित केले जाते. भविष्यात कर्करोगाच्या उपचारांमध्ये क्रांतिकारी बदल ही लस घडविण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर?

मॉडर्ना कंपनीने आधी करोना लस विकसित करण्यात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली होती. आता कंपनी कर्करोगावरील लस विकसित करण्यासाठी संशोधन करीत आहेत. कर्करोगावरील लशीचे नाव एमआरएनए-४३५९ आहे. करोनावरील लशीमध्ये वापरण्यात आलेले तंत्रज्ञान या लशीसाठी वापरले आहे. या तंत्रज्ञानामुळे शरीरातील प्रतिकारशक्ती निरोगी पेशी आणि कर्करोगग्रस्त पेशींमधील फरक ओळखू शकते. या लशीच्या पहिल्या टप्प्यातील वैद्यकीय चाचण्यांमध्ये १९ रुग्णांचा समावेश होता. त्यांना शेवटच्या टप्प्यातील कर्करोग होता. वैद्यकीय चाचण्यांमध्ये ८ रुग्णांमध्ये कर्करोगाच्या गाठींमधील वाढ थांबून नवीन गाठ निर्माण न झाल्याचे आढळून आले. या लशीला रुग्णांच्या शरीरानेही योग्य प्रतिसाद दिला आणि त्यांच्यावर कोणतेही गंभीर दुष्परिणाम दिसून आले नाहीत.

हेही वाचा : विश्लेषण: तारांगण संकल्पनेच्या शतकपूर्तीमुळे खगोलीय जिज्ञासा वाढेल?

तज्ज्ञांचे मत काय?

एमआरएनए-४३५९ लस कर्करोगाविरोधातील लढ्यात मैलाचा टप्पा ठरेल, असे या लशीच्या वैद्यकीय चाचण्यांचे मुख्य संशोधक डॉ. देबाशिष सरकार यांनी म्हटले आहे. शेवटच्या टप्प्यात कर्करोग असलेल्या रुग्णांवर कोणतेही उपचार यशस्वी होत नाहीत. अशा रुग्णांसाठी ही लस आशेचा किरण ठरेल. अशा रुग्णांवर उपचाराची नवीन पद्धती विकसित करण्याच्या दिशेने टाकलेले हे पहिले पाऊल आहे. ही लस शरीरातील प्रतिकारशक्तीसोबत सुसंगत राहून कर्करोगावर अधिक प्रभावीपणे उपचार करीत आहे. याच वेळी तिचे कोणतेही गंभीर दुष्परिणाम आढळून आले नाहीत, असेही डॉ. सरकार यांनी स्पष्ट केले. दरम्यान, वैद्यकीय चाचण्यांमधील रुग्णसंख्या ही अतिशय कमी होती, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. त्यामुळे आताच या लशीचा प्रभाव निश्चितपणे ठरविता येणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.

भविष्यातील दिशा ठरविणार?

सध्या विशिष्ट प्रकारच्या कर्करोग असलेल्या रुग्णांवर या लशीच्या चाचण्या सुरू आहेत. त्यात मेलॅनोमा आणि फुफ्फुसाचा कर्करोग असलेल्या रुग्णांचा समावेश आहे. कर्करोगावरील उपचार पद्धतीमध्ये एमआरएनए लशीचा वापर सर्वसाधारपणे होऊ शकतो का, हेतूने या लशीवर संशोधन सुरू झाले. याचबरोबर मॉडर्नाकडूनच मेलॅनोमावर वेगळी एमआरएनए लस विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच, बायोएनटेककडून फुफ्फुसावरील कर्करोगाच्या लशीच्या चाचण्या सुरू आहेत. कर्करोगावरील भविष्यातील उपचार पद्धतींचे दिशेने हे पाऊल पडले आहे. यामुळे शेवटच्या टप्प्यातील कर्करोग असलेल्या रुग्णांवर उपचारांच्या अनेक शक्यता निर्माण होणार आहेत. त्यातून त्यांचा कर्करोग बरा होण्याची आशाही निर्माण होईल.

हेही वाचा : विश्लेषण : हरियाणात भाजपने अनपेक्षितरित्या विजयाची हॅटट्रिक कशी साधली?

कर्करोगाचा धोका किती?

शरारीतील कोणताही अवयव अथवा पेशींना कर्करोग होऊ शकतो. एखाद्या पेशीची अनियंत्रित वाढ होऊन कर्करोगाची सुरुवात होते. या पेशीचा आकार वाढून ती शरीरातील इतर भागांवर अतिक्रमण करते आणि त्यातून इतर अवयवांनाही कर्करोगाचा संसर्ग होतो. यामुळे शरीरातील गुंतागुंत वाढून अखेर रुग्णाचा मृत्यू होता. पुरुषांमध्ये फुप्फुस, प्रोस्टेट, कोलोरेक्टल, पोट, यकृत हे कर्करोगाचे प्रमुख प्रकार तर महिलांमध्ये स्तन, कोलोरेक्टल, फुप्फुस, योनीमार्गाच्या मुखाचा आणि थायरॉईड हे कर्करोगाचे प्रमुख प्रकार आढळून येतात. जगभरात मानवाचा मृत्यू होण्याचे कर्करोग हे दुसरे प्रमुख कारण आहे. जगात २०१८ मध्ये ९६ लाख जणांचा म्हणजेच ६ पैकी एक मृत्यू हा कर्करोगामुळे झाला होता.

आरोग्य व्यवस्थेवरील ताण कमी?

जगभरातील अनेक देशांमध्ये कर्करुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातून तेथील कर्करुग्ण आणि त्यांच्या कुटुंबांवरील शारीरिक, मानसिक आणि वित्तीय ताण वाढत आहे. याचबरोबर समुदाय आणि आरोग्य व्यवस्थेवरील ताणही वाढत आहे. गरीब आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमधील आरोग्य व्यवस्था हा ताण सांभाळण्यास सक्षम नाहीत. त्यामुळे जगभरात मोठ्या प्रमाणात कर्करुग्णांना वेळेत निदान आणि उपचार उपलब्ध होत नाहीत. आरोग्य व्यवस्था सक्षम असलेल्या देशांत कर्करुग्ण वाचण्याचा दर अधिक आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे. त्यामुळे कर्करोगावरील नवीन लस कर्करुग्णांसह आरोग्य व्यवस्थेसाठीही वरदायी ठरेल.
sanjay.jadhav@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New vaccine to be available soon for cancer patients print exp css