सर्बियाचा अव्वल मानांकित टेनिसपटू नोव्हाक जोकोविच याचे 21वे ग्रँड स्लॅम जिंकण्याचे स्वप्न इतक्यात पूर्ण होण्याची चिन्हे नाहीत. त्याच्या अत्यंत आवडत्या ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत खेळण्याची संधी त्याला मिळणार होती. मेलबर्नवरील कोर्टवर दहावे ऑस्ट्रेलियन अजिंक्यपद आणि विक्रमी 21 ग्रँड स्लॅम अजिंक्यपद पटकावण्यापासून तो काही सामनेच दूर होता. पण ऑस्ट्रेलियात येऊन धडकल्यावर विमानतळावरच त्याला व्हिसा नाकारण्यात आला. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या जोकोविच ‘अवैध’ स्थलांतरित ठरला आणि त्याला मायदेशी पाठवण्याची कायदेशीर कारवाई सुरू करावी लागली. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जोकोविचला व्हिसा ऐन वेळी का नाकारण्यात आला?

ऑस्ट्रेलियन बॉर्डर पोलिसांच्या मते, जोकोविचने वैद्यकीय सवलतीसाठी सादर केलेले पुरावे पुरेसे नव्हते. ऑस्ट्रेलियामध्ये इतर अनेक देशांप्रमाणे बाहेरील देशातून येणाऱ्यांसाठी पूर्ण लसीकरण झालेले असणे अनिवार्य आहे. लसीकरण केल्यामुळे विपरीत शारीरिक प्रतिक्रिया घडून येत असल्यास अशा व्यक्तींनाच लसीकरणातून सूट देण्यात येते. 

जोकोविचला लसीकरणातून सूट कोणत्या कारणासाठी मिळाली?

जोकोविचने किंवा ऑस्ट्रेलियन स्पर्धेच्या संयोजकांनी सवलतीविषयीचे नेमके कारण विशद केलेले नाही. सूट कोणत्या कारणासाठी द्यावी यासाठीचे नियम आहेत. विपरीत शारीरिक प्रतिक्रिया, पूर्वी लशीचा डोस घेतल्यानंतर शरीरावर दुष्परिणाम झाल्याचे आढळून आले असल्यास किंवा अलीकडेच कोविड होऊन गेला असल्यास लस न घेण्याची सूट दिली जाते व जगभरची अनेक सरकारे अशा व्यक्तींना प्रवेश किंवा व्हिसा बहाल करतात. ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धेसाठी अशा 26 विविध व्यक्तींना सूट मिळाल्याने व्हिसा देण्यात आला होता. जोकोविच अशांपैकीच एक. 

प्राथमिक परवानगी होती, तर ऐन वेळी जोकोविचला का थांबवले गेले?

ही स्पर्धा जेथे खेळवली जात आहे, तेथे करोनाच्या उद्रेकामुळे अनेकदा टाळेबंदी लादावी लागलेली होती. जोकोविच हा ऑस्ट्रेलियन टेनिसप्रेमींचा लाडका असला, तरी करोनामुळे आणि लसीकरण झालेले नसल्यास स्थानिकांवर निर्बंध पण परदेशी पाहुण्यांसाठी पायघड्या घालण्यास अनेकांनी जाहीर विरोध दर्शवला होता. मेलबर्न ज्या प्रांताची राजधानी आहे, त्या व्हिक्टोरियाच्या स्थानिक सरकारला तसेच ऑस्ट्रेलियाच्या केंद्र (फेडरल) सरकारलाही या असंतोषाची दखल घेणे भाग पडले. खुद्द पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनीही ‘कायद्याच्या वर कोणी नाही’ असे ट्वीट केले. 

ऑस्ट्रेलियन ओपन आणि जोकोविच…

ज्याप्रमाणे फ्रेंच ओपन स्पर्धेत पॅरिसच्या लाल मातीच्या कोर्टवर राफाएल नडालचे निर्विवाद वर्चस्व चालते, त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलियन स्पर्धेच्या हार्डकोर्टवर जोकोविच अनभिषिक्त सम्राट आहे. तो येथे 10वेळा अजिंक्य ठरलेला आहे. गेल्या सलग तीन स्पर्धांमध्ये तो जिंकला होता. 2011मध्ये फेडररच्या नावावर 16 आणि नडालच्या नावावर 9 ग्रँड स्लॅम अजिंक्यपदे असताना, जोकोविचने एकदाच ग्रँड स्लॅम स्पर्धा (अर्थातच ऑस्ट्रेलियन) जिंकली होती. आज त्याच्या नावावर फेडरर आणि नडालप्रमाणेच 20 अजिंक्यपदे आहेत. तो हा विक्रम मोडू शकेल, पण त्यासाठी त्याला जूनपर्यंत वाट पाहावी लागेल. 

इतक्या महान टेनिसपटूला लशीविषयी तिटकारा का?

सर्वच लशींविषयी नाही, तरी कोविड लशीविषयी आपण साशंक असल्याचे त्याने पूर्वीही म्हटले होते. काही वृत्तमाध्यमांनुसार, धार्मिक कारणांमुळे जोकोविचचा लशींना विरोध आहे. खुद्द जोकोविचने यावर भाष्य केलेले नाही. त्याने स्वतःचे लसीकरण झाले की नाही यावरही ठोस विधान केलेले नाही. कोविडचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर त्याने सर्व विरोध झुगारून प्रदर्शनीय टेनिस सामने भरवले आणि त्यातून त्यालाच एकदा कोविडबाधा झाली होती. 

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Novak djokovics court martial msr 87 print exp 0122