हल्ली हृदयरोग, कर्करोग आणि मधुमेह अशा असंसर्गजन्य आजारांचे (noncommunicable diseases) प्रमाण वाढताना दिसते आहे. अगदी पौगंडावस्थेतील मुलांसहित बालकांमध्येही अशा आजारांचे प्रमाण वाढलेले आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतातील एका प्रमुख संशोधन संस्थेने गर्भवती महिला, स्तनदा माता, मुले आणि वयोवृद्ध यांच्या योग्य पोषणासाठी सर्वसमावेशक अशी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हैद्राबादमधील राष्ट्रीय पोषण संस्थेने (NIN) ही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) अंतर्गत ही संस्था काम करते. या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये मीठ आणि भरपूर प्रक्रिया केलेल्या पदार्थांचा (जसे की पाकीटबंद चिप्स, कुकीज्, ब्रेड, केचअप, कँडी इ.) वापर कमी करणे यांसारख्या सामान्य सूचनांचाही समावेश आहे. या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये असे म्हटले आहे की, भारतातील एकूण आजारांपैकी ५६.४ टक्के आजार हे अनारोग्यदायी आहार घेतल्याने होतात. दुसरीकडे, आरोग्यदायी आहार आणि नियमित शारीरिक कसरती केल्यामुळे मधुमेह, हृदयरोग आणि उच्च रक्तदाबाची समस्या जवळपास ८० टक्क्यांनी कमी होते.

हेही वाचा : स्वतःच्या मुलींच्या कौमार्याचा बाजार मांडणारं हीरामंडीचं भयाण वास्तव; कलंकित इतिहास काय सांगतो?

लहान मुले आणि मातांवर अधिक लक्ष

बाळाची योग्य वाढ आणि विकास होण्यासाठी गर्भधारणेपासून ते बाळ दोन वर्षांचे होईपर्यंत आई आणि बाळाचे योग्य पोषण होणे अत्यंत गरजेचे ठरते. योग्य पोषणामुळे सर्व प्रकारचे कुपोषण टाळता येऊ शकते. योग्य पोषण न झाल्यास बाळामध्ये सूक्ष्म पोषक घटकांची कमतरता तसेच लठ्ठपणाची समस्याही निर्माण होऊ शकते.

ही मार्गदर्शक तत्त्वे जारी करताना सर्वसमावेशक राष्ट्रीय पोषण सर्वेक्षण २०१९ मधील आकडेवारीचा आधारही घेण्यात आला आहे. २०१९ च्या या राष्ट्रीय पोषण सर्वेक्षणानुसार, बालकांमध्येही जीवनशैलीतील बदलांमुळे उद्भवणाऱ्या समस्या वाढत आहेत. तसेच, ५-९ वर्षे वयोगटातील पाच टक्के मुले; तर पौगंडावस्थेतील सहा टक्के मुले लठ्ठपणाच्या समस्येशी झुंजत आहेत. जवळपास दोन टक्के पौगंडावस्थेतील मुले आणि बालकांमध्ये मधुमेहाची समस्या आढळून आली आहे; तर १० टक्के बालके मधुमेहपूर्व स्थितीमध्ये आहेत. याच सर्वेक्षणानुसार, ५-९ वर्षे वयोगटातील ३७.३ टक्के बालकांमध्ये; तर १०-१९ वर्षे वयोगटातील १९.९ टक्के किशोरवयीन मुलांमध्ये बॅड कोलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त होते. गुड कोलेस्ट्रॉलची पातळी दर चौथ्या मुलामध्ये कमी आहे.

पोषणासमोरचे आव्हान

वय वर्षे १ ते १९ दरम्यानच्या वयोगटातील मुलांमध्ये जस्त, लोह, व्हिटॅमिन अशा सूक्ष्म पोषक घटकांच्या कमतरतेचे प्रमाण १३ टक्क्यांवरून ३० टक्क्यांपर्यंत वाढले आहे. कर्बोदकांच्या कमतरतेमुळे उद्भवणारे गंभीर कुपोषण (Marasmus) आणि प्रथिनांच्या कमतरतेची समस्या (Kwashiorkor) भारतात नसली तरीही रक्ताल्पतेची (Anaemia) समस्या अद्यापही आहे. २०१९ च्या या राष्ट्रीय पोषण सर्वेक्षणातील आकडेवारीचा विचार करता, ५ वर्षे वयाखाली ४०.६ टक्के, ५-९ वर्षे वयोगटामध्ये २३.५ टक्के आणि १०-१९ वर्षे वयोगटातील २८.४ टक्के बालकांना रक्ताल्पतेची समस्या आढळून आली आहे. ‘द लॅन्सेट’मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार, भारतात एकीकडे कुपोषणाच्या समस्येचे प्रमाण अद्यापही जास्त आहे; तर दुसरीकडे लठ्ठपणाच्या समस्येचे प्रमाणही गेल्या ३० वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

आरोग्यदायी पदार्थांपेक्षा अनारोग्यदायी, अधिक प्रक्रिया केलेले, उच्च चरबीयुक्त आणि साखर-मीठाचे प्रमाण अधिक असणारे पदार्थ (HFSS) परवडणारे झाले असून ते मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाले आहेत. असे पदार्थ खाल्ल्याने शरीरातील लोह आणि फॉलिक ॲसिडचे प्रमाण कमी होते. त्यामुळे रक्ताल्पता तसेच लठ्ठपणाचे प्रमाणही सर्व वयोगटांमध्ये वाढलेले दिसून येते आहे. थोडक्यात, सदोष आहार पद्धती वाढीस लागली असल्याचे लॅन्सेटच्या अहवालामध्ये म्हटले आहे.

आरोग्यदायी आहार घेण्याबाबतची सर्वसामान्य तत्त्वे

राष्ट्रीय पोषण संस्थेने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, भाज्या, पालेभाज्या, कंदमुळे, दुग्धजन्य पदार्थ आणि तेल यांसह किमान आठ प्रकारच्या अन्न गटांच्या माध्यमातून शरीराला आवश्यक असणारी पोषक तत्त्वे मिळवली पाहिजेत. यामध्ये भारतीय आहाराचा मुख्य भाग असणाऱ्या तृणधान्यांचा वापर मर्यादित असावा; जेणेकरून शरीराला लागणाऱ्या एकूण उर्जेमध्ये तृणधान्यांचे योगदान ५०-७० टक्क्यांवरून ४५ टक्क्यांवर येऊ शकेल. या तृणधान्यांऐवजी शरीराला अधिकाधिक प्रथिने प्राप्त व्हावीत, यासाठी प्रथिनयुक्त पदार्थांचे (डाळी, मांस, चिकन, मासे) प्रमाण ६-९ टक्क्यांवरून १४ टक्क्यांपर्यंत वाढवले पाहिजे.

शाकाहारी लोकांसाठी आवश्यक पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिडस् (PUFA) आणि B12 ची पातळी पुरेशी राखणे आव्हानात्मक ठरू शकते. त्यामुळे राष्ट्रीय पोषण संस्थेच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये अंबाडीच्या बिया, सब्जाच्या बिया, अक्रोड, भाज्या आणि पालेभाज्या भरपूर प्रमाणात खाण्याची शिफारस करण्यात आली आहे. या मार्गदर्शन तत्त्वांनुसार, आहारातील मिठाचा वापर दिवसातून पाच ग्रॅमपर्यंतच मर्यादित असावा. अधिक चरबी, मीठ अथवा साखरेचे प्रमाण अधिक असणारे पदार्थ कटाक्षाने टाळण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

हेही वाचा : बँक ऑफ बडोदाच्या मोबाइल ॲपवरील बंधने मागे; RBI ने का केली होती कारवाई?

मार्गदर्शक तत्त्वे

गर्भवती महिला : मळमळ आणि उलट्या होत असलेल्या महिलांनी थोड्या थोड्या प्रमाणात सतत जेवण करावे. शरीरातील लोह आणि फोलेटचे प्रमाण अधिक वाढावे, यासाठी फळे आणि भाज्यांचे सेवन भरपूर प्रमाणात करावे.

बालके आणि मुले : जन्मापासून सहा महिन्यापर्यंत बालकांना फक्त आईचे दूधच देण्यात यावे. त्यांना मध, बाहेरील दूध अथवा इतर पदार्थ अजिबात देऊ नयेत. उन्हाळ्याचे दिवस असले तरी अशा बालकांना पाणी पाजण्याचीही गरज नसते. सहा महिन्यांनंतर बाळाच्या आहारात इतर पूरक पदार्थांचा समावेश करावा.

प्रौढ : प्रौढांनी प्रथिने, कॅल्शियम, सूक्ष्म पोषकद्रव्ये आणि फायबरयुक्त पदार्थांचे अधिकाधिक सेवन करावे. डाळी आणि तृणधान्यांचे प्रमाण पुरेसे असावे. याशिवाय किमान २००-४०० मिली कमी चरबीयुक्त दूध किंवा दुग्धजन्य पदार्थही आहारात असावेत. त्याबरोबरच मूठभर काजू वा तेलबिया तसेच ४००-५०० ग्रॅम भाज्या आणि विविध फळांचे सेवन करावे. हाडांची घनता आणि स्नायूंमध्ये मजबूती राखण्यासाठी व्यायाम करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nutrition guidelines disease burden linked to unhealthy diets vsh
First published on: 10-05-2024 at 17:13 IST