Nepalese army has a glorious history: नेपाळमध्ये पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी राजीनामा दिल्यानंतर देशात निर्माण झालेली परिस्थिती सांभाळण्याची जबाबदारी सेनाप्रमुख जनरल अशोक राज सिग्देल यांच्यावर आली होती. जनरल सिग्देल यांनी भारतातील सिकंदराबाद येथील डिफेन्स मॅनेजमेंट कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केलं आहे. इतकंच नाही तर त्यांना भारतीय सैन्यातील मानद जनरलचा दर्जा बहाल करण्यात आला होता. म्हणूनच त्यांची भूमिका नेपाळच्या भविष्यासाठी महत्त्वाची ठरणार असल्याचं तज्ज्ञ सांगतात.
नेपाळमध्ये गंभीर राजकीय संकट; सैन्यप्रमुख सिग्देल यांच्यावर सर्वांची नजर
सैन्यप्रमुख जनरल अशोक राज सिग्देल हे नेपाळच्या नव्या सरकारच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. Gen-Z आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसक निदर्शनांत जीवितहानी टाळण्यासाठीच जनरल सिग्देल यांनी तत्कालीन पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांना राजीनामा द्यावा असा सल्ला दिला होता.
सात दशकांची परंपरा कायम
भारत आणि नेपाळ यांच्यात घट्ट लष्करी संबंधही आहेत. दोन्ही देश एकमेकांच्या सेनाप्रमुखांना मानद जनरलचा दर्जा बहाल करतात. गेली तब्बल सात दशके ही परंपरा सुरू आहे. १९५० साली भारतीय सैन्यप्रमुख जनरल के. एम. करिअप्पा हे हा सन्मान मिळवणारे पहिले सेनाप्रमुख ठरले. मागच्या वर्षी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून अशोक राज सिग्देल यांना भारतीय सैन्याचा मानद जनरल हा दर्जा देण्यात आला होता. भारत-नेपाळ यांच्यातील लष्करी मैत्रीची ही परंपरा आजही टिकून आहे.
नेपाळी सैन्याचा इतिहास
संपूर्ण जगाच्या इतिहासात १७ व शतक हे राजकीय अस्थिरतेसाठी ओळखलं जातं. या कालखंडात राज्यांमधील संघर्ष फक्त या भूमीपुरता मर्यादित नव्हता. ब्रिटन, फ्रान्स आणि पोर्तुगालसारख्या साम्राज्यवादी शक्तींनी वेगवेगळ्या प्रदेशांत वसाहती स्थापन केल्या. त्यांच्या स्वार्थसंघर्षामुळे अनेक देशांत युद्धजन्य परिस्थिती होती. दक्षिण आणि आग्नेय आशियातही ब्रिटन आणि फ्रान्सची पावलं पडू लागली, त्यामुळे नेपाळलाही धोका निर्माण झाला होता.
प्रिथ्वी नारायण शाहांच्या नेतृत्वाखाली सैन्याची उभारणी
- त्या काळात ईस्ट इंडिया कंपनीने भारतातील मोठा भूभाग ताब्यात घेतला होता. ईस्ट इंडिया कंपनीने नेपाळच्या दिशेनेही कूच केली होती. त्यावेळी नेपाळ अनेक छोट्या संस्थानांत विभागलेलं होतं. अशा वेळी गोरखा संस्थानाचे राजा प्रिथ्वी नारायण शाह यांनी नेपाळ एकसंध करण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्यामुळेच आधुनिक नेपाळाचे जनक म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली.
- गोरखासारखं छोटं आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत संस्थान होतं, तरीही प्रिथ्वी नारायण शाहा यांनी कठीण परिस्थितीत नेपाळच्या एकत्रीकरणाचा प्रयोग यशस्वी करून जगाला चकित केलं.
- हाच नेपाळी सैन्याच्या इतिहासातील निर्णायक वळणबिंदू ठरला. एकत्रीकरणासाठी बलशाली सैन्याची गरज होती, त्यामुळे सैन्यव्यवस्थापनही अत्युत्कृष्ट असणं आवश्यक होतं. गोरखामध्ये असलेल्या नियमित सैन्याबरोबरच युद्धसामग्री तयार करण्यासाठी परदेशातून तज्ज्ञ बोलावण्यात आले. गोरखाली सैन्याने काठमांडू (तेंव्हाच नेपाळ) जिंकल्यानंतर या सैन्याला नेपाळी आर्मी म्हणून ओळख मिळाली.
शौर्याने जग थक्क करणारे गोरखा सैनिक
गोरखा सैनिकांच्या शौर्याने, प्रामाणिकपणाने आणि साधेपणाने शत्रूलाही इतके प्रभावित केले की, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनेच नेपाळी जवानांची भरती आपल्या सैन्यात सुरू केली. त्या वेळी नेपाळी सैन्याला प्रचलित भाषेत ‘गोरखा आर्मी’ किंवा ‘गोरखाली म्हणत. त्यामुळे ब्रिटिशांनी नव्या सैनिकांना ‘गोरखा’ असं नाव दिलं. त्यामुळेच नेपाळी सेना ही ब्रिटिश किंवा भारतीय सैन्याचा भाग आहे असा समज आजही अनेकांच्या मनात आहे. परंतु, खरी नेपाळ आर्मी ही सार्वभौम आणि स्वतंत्र नेपाळची अभिमानास्पद राष्ट्रीय सेना आहे. १७४४ सालापासून आजतागायत तिचा इतिहास अखंड चालू आहे. तर, गोरखा रायफल्स हे सैन्यदल वेगळे आहे.
नेपाळ आणि नेपाळी जनता कोणत्याही वसाहतवादी साम्राज्याखाली कधीच झुकली नाही, हा नेपाळी सैन्याचा सर्वांत मोठा विजय आहे. राजा प्रिथ्वी नारायण शाह हेच नेपाळी सैन्याचे संस्थापक होते.
नेपाळी सैन्याच्या ध्वजावर त्रिशूळ आणि डमरू
नेपाळी सैन्याच्या ध्वजावर कोरलेली चिन्ह भारतीय परंपरांशी आपलं असलेलं घट्ट नातं अधोरेखित करतात. भगवान शंकरांचा त्रिशूळ आणि डमरू या ध्वजावर शोभून दिसतात. नेपाळचं मूळचं हिंदू परंपरांशी जोडलेलं असल्याने त्याचं भारताशी असलेलं नातं सहज आणि स्वाभाविक आहे.