घरकाम करणाऱ्या नवऱ्याला क्षुल्लक कारणावरून मारहाण करून मुख्याध्यापक पत्नीने घरातून हाकलून दिले. वारंवार विनवणी करून नांदण्यास नकार दिल्यामुळे हलाखीचे जीवन जगणारया नवऱ्याने मुख्याध्यापक पत्नीकडून पोटगी मिळण्यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे.
अजय व संगीता (दोघांचेही नाव बदलले आहे.) यांचा विवाह २००४ साली झाला होता. संगीता ही उच्च विद्याविभूषित तर संजय हा मात्र अशिक्षित आहे. संगीता ही एका शाळेची मुख्याध्यापिका आहे. अजयच्या घरची आíथक परिस्थिती अतिशय बेताची होती. दोघांची ओळख एका वधू-वर परिचय मेळाव्यात झाली होती. अजय हा सांगली जिल्ह्यातील राहणारा तर संगीता ही सोलापूर जिल्ह्यात राहणारी. अजयने त्याच्या संपूर्ण परिस्थितीची कल्पना संगीता हिला दिली होती. तरीही संगीताने अजयबरोबर विवाह करण्याची इच्छा व्यक्त केली आणि तसा आग्रह धरला. मात्र तिने अशी अट घातली, की ती नोकरी करते. त्यामुळे ती अजयच्या गावी नांदण्यासाठी येऊ शकणार नाही. अजयनेच तिच्या घरी नांदण्यास यावे. तिने अशीही अट घातली, की ती नोकरी करीत असल्याने घरातील कामे करू शकणार नाही. त्यामुळे अजयनेच घरातील कामांची जबाबदारी घ्यावी. गरीब परिस्थितीमुळे अजय याने या दुनियादारीच्या उलट अटी मान्य केल्या. ठरल्याप्रमाणे दि. २४ नोव्हेंबर २००४ रोजी सांगली जिल्ह्यात जत तालुक्यातील गुड्डापूर येथे दानम्मादेवी देवस्थान येथे दोघांचा विवाह झाला.
अगोदर ठरल्यानुसार अजय संगीताच्या घरी नांदण्यासाठी आला. संगीताने घातलेल्या सर्व अटींचे पालन करीत अजय हा घरातील सर्व कामे म्हणजे स्वयंपाक करणे, भांडी घासणे, कपडे धुणे व इतर सर्व कामे तो करायचा. संगीता ही नोकरीला असल्यामुळे सकाळी झोपेतून उठल्यानंतर तयार होऊन ती नोकरीस जात असे. जाताना तिला अजय जेवणाचा डबा तयार करून देत असे. झाडलोट करण्यापासून ते संगीता हिचे पाय चेपण्यापर्यंतची सर्व कामे अजय हा निमूटपणे करीत होता. संगीता ही रागीट स्वभावाची होती. तिचे बंधू पोलीस खात्यात नोकरी करीत होते. काही महिन्यांपूर्वी अजयच्या हातून दूध सांडले. त्यामुळे एवढय़ाच कारणावरून संगीता हिने अजयला शिवीगाळ व मारहाण केली. एवढेच नव्हे तर रागाने त्याला घरातून हाकलून दिले. अजयने तिचे पाय धरून माफी मागितली. तरीही उपयोग झाला नाही. संगीताने घरातून हाकलून देत नांदविण्यास नकार दिल्यापासून अजय हा हलाखीचे जीवन जगत आहे. त्यामुळे अखेर अजय याने पत्नी संगीता हिच्या विरुद्ध सोलापूरच्या दिवाणी न्यायालयात अॅड जयदीप माने व अॅड मनोज गिरी यांच्या मार्फत धाव घेतली आहे. िहदू विवाह कायदा कलम ९ व २४ अन्वये संगीता हिने आपणास नांदविण्यासाठी घरात घ्यावे व प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत तिने पोटगी देण्याबद्दल आदेश व्हावेत, असा अर्ज अजयने सादर केला आहे. दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर हेमलता भोसले यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 24th Nov 2015 रोजी प्रकाशित
पत्नीकडून पोटगीसाठी पतीची न्यायालयात धाव
हलाखीचे जीवन जगणारया नवऱ्याने मुख्याध्यापक पत्नीकडून पोटगी मिळण्यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे.
Written by दया ठोंबरे
First published on: 24-11-2015 at 01:27 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Husband in court for alimoney from wife