विधानपरिषद निवडणुकीच्या राजकीय हालचालींना आज-शुक्रवारी चांगलीच गती आली. अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेले काँग्रेसचे माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी अर्ज माघारी घेतला. तसेच पक्षाचे अधिकृत उमेदवार सतेज पाटील यांना पािठबा देत असल्याचे जाहीर केले.
विधानपरिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यानंतर उमेदवारांनी प्रचाराचे केंद्र इचलकरंजी शहराकडे लक्ष वळवले आहे. गुरुवारपाठोपाठ शुक्रवारीही आमदार महादेवराव महाडीक यांनी इचलकरंजीतील प्रमुखांशी चर्चा केली. तर त्यांचे स्पर्धक सतेज पाटील यांनी जवाहर साखर कारखान्यावर अध्यक्ष प्रकाश आवाडे यांची भेट घेतली. यावर उमेदवार प्रकाश आवाडे कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष वेधले आहे.
विधानपरिषद निवडणुकीसाठी अर्ज भरल्यानंतर लगेचच महाडीक व सतेज पाटील या दोघांनीही आपली व्यूहरचना गतिमान केली आहे. तथापि दोघांनीही कोल्हापूरनंतर सर्वाधिक मतदान असलेल्या इचलकरंजीकडे विशेष लक्ष पुरविले आहे. काल महाडीक यांनी शहर विकास आघाडीच्या नगरसेविका व अपक्ष उमेदवार ध्रुवती दळवाई यांच्या निवासस्थानी आघाडीच्या नगरसेवकांशी चर्चा करुन पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला. तर शुक्रवारी सकाळी शहर काँग्रेस भवनात प्रकाश आवाडे यांची भेट घेतली. निवडणूक लढविण्याबाबत आवाडे हे काँग्रेसचे नगरसेवक व पदाधिकाऱ्यांसमवेत चर्चा करीत असताना तेथे महाडीक अचानक आले. त्यांनी थेट बठकीच्या ठिकाणी जाऊन आवाडे यांना प्रस्ताव दिला. आवाडे यांची बंडखोरीची तयारी असल्यास माघार घेऊन मी त्यांना पाठिंबा देण्यास तयार आहे, याचा पुनरुच्चार करतानाच महाडीक यांनी पक्षाने सतेज पाटील यांना माघार घेण्यास सांगून निवडणूक बिनविरोध केल्यास त्यासाठीही आपली तयारी असल्याचे सांगितले. तथापि आवाडे यांनी नगरसेवकांची मते आजमावून आपला निर्णय कळवणार असल्याचे महाडीक यांना सांगितले.
महाडीक यांच्या इचलकरंजी भेटीचा परिणाम म्हणून सतेज पाटील यांनाही आपला मोर्चा इचलकरंजीकडे वळवावा लागला. महाडीक यांनी इचलकरंजी सोडल्यानंतर लगेचच पाटील यांनी आवाडे यांची हुपरी येथील जवाहर साखर कारखाना कार्यस्थळी भेट घेतली. काँग्रेस पक्षाने आपल्याला उमेदवारी दिली असून पक्षाचे वरिष्ठ व एकनिष्ठ म्हणून साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान, विधानपरिषदेचे माजी सदस्य, राष्ट्रवादीचे नगरसेवक अशोक जांभळे व काँग्रेसचे माजी नगरसेवक प्रकाश मोरबाळे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले असून त्यांच्या भूमिकेकडेही लक्ष लागले आहे. तर महाडीक यांना पाठिंबा मिळवण्यासाठी गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी शुक्रवारी दिवसभरात इचलकरंजीतील नगरसेवकांच्या गाठीभेटी घेतल्या. त्यावर सतेज पाटील यांच्या समर्थकांनीही नगरसेवकांच्या भेटीगाठीचा सिलसिला सुरू ठेवला होता.