‘कशी नशिबानं थट्टा आज मांडली..’ हेच गाणे महेंद्रसिंग धोनीच्या अपयशाचे नेमके चित्र रेखाटण्यासाठी समर्पक ठरेल. ऐतिहासिक ईडन गार्डन्सवरील रौप्यमहोत्सवी एकदिवसीय सामन्यात भारत-पाकिस्तान यांच्यातील दिग्गज क्रिकेटपटू आणि ६६ हजार क्रिकेटरसिकांच्या साक्षीने कप्तान महेंद्रसिंग धोनीचा ‘मिडास टच’ पूर्णत: संपल्याची ग्वाही क्रिकेटजगताला मिळाली. पाकिस्तानी संघाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ८५ धावांनी विजय मिळवित तीन सामन्यांची मालिका २-० अशी रुबाबत खिशात घातली आहे.
महिन्याभरापूर्वीच इंग्लिश संघाने भारतीय भूमीवर कसोटी मालिका जिंकण्याचा ऐतिहासिक पराक्रम दाखविला होता. फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि नेतृत्व या क्रिकेटच्या चारही पातळीवरील त्या अपयशाची पुनरावृत्ती मग पाकिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतही दिसून आली. भारताची फलंदाजीची फळी चेन्नईच्या पहिल्या एकदिवसीय सामन्याप्रमाणे ईडन गार्डन्सवरही पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे फक्त १६५ धावांत कोसळली. त्यामुळे पाकिस्तानचे २५१ धावांचे आव्हान पार करणे भारताला अशक्य झाले. भारतीय क्रिकेटरसिकांना निराश करणाऱ्या या पराभवामुळे नेहमी ‘संक्रमणाची गाथा’ मांडणाऱ्या धोनीच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.
पाकिस्तानचा सलामीवीर नासिर जमशेदने सलग दुसऱ्या सामन्यात शतक झळकावून पाकिस्तानच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला, तर जुनैद खान, मोहम्मद इरफान आणि सईद अजमल यांनी प्रभावी गोलंदाजी करीत भारताच्या फलंदाजीच्या फळीला बेचिराख केले. भारताकडून कप्तान महेंद्रसिंग धोनीने (नाबाद ५४ धावा) एकाकी झुंज दिली. ईडन गार्डन्सवर पाकिस्तानविरुद्धच्या चौथ्या सामन्यातही भारताच्या पदरी अपयश पडल्यामुळे या सामन्यासाठी हजेरी लावणाऱ्या ६६हजार क्रिकेटरसिकांची घोर निराशा झाली.
संग्रहित लेख, दिनांक 4th Jan 2013 रोजी प्रकाशित
फिर वही कहानी!
‘कशी नशिबानं थट्टा आज मांडली..’ हेच गाणे महेंद्रसिंग धोनीच्या अपयशाचे नेमके चित्र रेखाटण्यासाठी समर्पक ठरेल. ऐतिहासिक ईडन गार्डन्सवरील रौप्यमहोत्सवी एकदिवसीय सामन्यात भारत-पाकिस्तान यांच्यातील दिग्गज क्रिकेटपटू आणि ६६ हजार क्रिकेटरसिकांच्या साक्षीने कप्तान महेंद्रसिंग धोनीचा ‘मिडास टच’ पूर्णत: संपल्याची ग्वाही क्रिकेटजगताला मिळाली.
First published on: 04-01-2013 at 02:33 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Another series defeat for india as batsmen flop again