द्रोणावली हरिका या भारतीय खेळाडूने महिलांच्या जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत उपांत्य फेरीत स्थान मिळविले. ही स्पर्धा खांती मनियास्क (रशिया) येथे सुरू आहे. हरिका हिने चुरशीने झालेल्या लढतीत चीनच्या झाओ झुई या चौथ्या मानांकित खेळाडूवर मात केली. या दोन खेळाडूंमध्ये दोन डावांअखेरीस १-१ अशी बरोबरी झाल्यानंतर दोन जलद डाव खेळविण्यात आले होते. त्यामध्ये हरिकाने सरशी मिळविली. तिने काळ्या मोहरांच्या साहाय्याने खेळताना पहिला डाव जिंकला. तिने किंग्ज इंडियन डिफेन्सचा उपयोग केला. पाठोपाठ तिने दुसऱ्या डावात बरोबरी साधली. हरिका हिला उपांत्य फेरीत युक्रेनच्या अ‍ॅना उशेनिना हिच्याशी खेळावे लागणार आहे.