जमैकाचा महान धावपटू असाफा पॉवेल उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्यानंतर चीनमधील क्रीडासाहित्य बनविणाऱ्या ली-निंग या कंपनीने पॉवेलसोबतचा करार मोडीत काढला आहे. उत्तेजक विरोधी कायद्याचा भंग केल्याप्रकरणी पॉवेलला इटलीत फौजदारी चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.
‘‘१०० मीटर शर्यतीतील माजी विश्वविक्रमवीर पॉवेलने घेतलेल्या अथक परिश्रमाचा आणि मेहनतीचा आम्ही आदर करतो. पण उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्यानंतर आम्ही त्याच्यासोबतचा करार रद्द केला आहे,’’ असे कंपनीच्या पत्रकात म्हटले आहे. जमैकाच्या राष्ट्रीय अजिंक्यपद शर्यतीदरम्यान पॉवेल आणि त्याची सहकारी शेरॉन सिम्पसन यांच्या उत्तेजक चाचणीत ऑक्सिलोफ्रोन हे उत्तेजक घेतल्याचे समोर आले आहे. याच स्पर्धेत थाळीफेकपटू अ‍ॅलिसन रँडाल आणि अन्य दोन अ‍ॅथलीट्स उत्तेजक चाचणीत दोषी आढळले होते.
‘‘खेळाची प्रतिमा मलीन करणाऱ्यांच्या आम्ही विरोधात आहोत. त्यामुळे पॉवेलसोबतचा करार तात्काळ रद्द करण्यात येत आहे,’’ असेही कंपनीने म्हटले आहे. मात्र आपण कोणतेही चुकीचे कृत्य केलेले नाही, असे पॉवेलने म्हटले आहे. अमेरिकेचा धावपटू टायसन गे हासुद्धा उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्यानंतर ‘आदिदास’ने त्याच्यासोबतचा करार रद्द करण्याचे ठरवले आहे.