मायकेल क्लार्क रविवारी दुपारी जेव्हा मैदानावर उतरला होता, तेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या साडेचारशे धावसंख्येपुढे ऑस्ट्रेलियाची ३ बाद ४० अशी केविलवाणी अवस्था झाली होती. कांगारू पहिली कसोटी गमावणार तर नाही ना, ही शंका येणे स्वाभाविक होते. पण ऑसी कप्तान मायकेल क्लार्कला हे नामंजूर होते. तो आठ तास मैदानावर लढला. चौथ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियन क्रिकेटरसिकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते. कारण नशिबाचे पारडे फिरले होते आणि ऑस्ट्रेलियाच्या धावफलकावर ४ बाद ४८७ अशी धावसंख्या अभिमानाने झळकत होती. क्लार्कच्या नावापुढील नाबाद द्विशतक त्याच्या झुंजार वृत्तीचे दर्शन घडवीत होत्या. सकारात्मक फलंदाजीमुळेच हे साध्य झाल्याचे सांगणाऱ्या क्लार्कला आता पाचव्या आणि अखेरच्या दिवशी चमत्कारिक विजयाची अपेक्षा आहे.
३१ वर्षीय क्लार्क सोमवारी खेळ थांबल्यावर पॅव्हेलियनकडे परतत असताना ऑस्ट्रेलियन क्रिकेटरसिकांनी त्याचे यथोचित स्वागत केले. क्लार्क २१८ धावांवर खेळत आहे. त्याने ईडी कोवानसोबत चौथ्या विकेटसाठी २५९ धावांची, तर माइक हसीसमवेत पाचव्या विकेटसाठी नाबाद १८८ धावांची भागीदारी साकारली. त्यामुळेच ऑस्ट्रेलियाकडे आता ३७ धावांची आघाडी आहे.    

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Clarck hit double centuray save australia