Dewald Brewis No Look Sixes Hattrick Video: दक्षिण आफ्रिका वि. ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसरा टी-२० क्रिकेट सामना खेळवला जात आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या डेवाल्ड ब्रेविसने वादळी अर्धशतक झळकावलं आहे. ‘बेबी एबी’ नावाने प्रसिद्ध असलेल्या ब्रेविसने आपल्या फलंदाजीने सर्वांची मनं जिंकली आहेत. ब्रेविसने दुसऱ्या टी-२० सामन्यात शतकी खेळी केल्यानंतर तिसऱ्या सामन्यातही अर्धशतक केलं आहे. यादरम्यान त्याने षटकारांची हॅटट्रिक लगावली आहे.
पुढील वर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषकापूर्वी, गतविजेता ऑस्ट्रेलिया आणि गेल्या वर्षीच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या दक्षिण आफ्रिके यांच्यातील टी-20 मालिकेतील अखेरचा निर्णायक सामना खेळवला जात आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी केली आणि गेल्या सामन्याप्रमाणे, ब्रेविस पुन्हा एकदा आफ्रिकेच्या फलंदाजीचा स्टार ठरला.
गेल्या सामन्यात, २२ वर्षीय ब्रेविसने त्याचं पहिलं शतक झळकावले, याआधारे दक्षिण आफ्रिकेने सामना जिंकला. तिसऱ्या टी-२० सामन्यात ब्रेविसने २६ चेंडूत ६ षटकार आणि एका चौकारासह ५३ धावांची खेळी करत संघाला मजबूत स्थितीत आणले.
बेबी एबी ऑस्ट्रेलियाला पडला भारी, झळकावलं वादळी अर्धशतक
दक्षिण आफ्रिकेची अवस्था ३२ धावांत २ विकेट असताना ब्रेविस फलंदाजीला आला. त्याने येताच पुल शॉटवर एक दणदणीत षटकार मारला, ज्यामुळे चेंडू स्टेडियमच्या छतावर आदळला. यानंतर त्याने १०व्या षटकात वेगवान गोलंदाजी एरॉ हार्डीची चांगलीच धुलाई केली.
ब्रेविसने १० व्या षटकाच्या पहिल्या २ चेंडूंवर फक्त २ धावा घेतल्या आणि पुढच्या ४ चेंडूंवर षटकारांचा वर्षाव केला. उजव्या हाताच्या या फलंदाजाने तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर सलग ‘नो-लूक षटकार’ मारण्याची हॅटट्रिक केली. सहसा, फलंदाज फटका खेळल्यानंतर चेंडू कुठे जातोय हे पाहतात, परंतु ब्रेविस शॉट खेळल्यानंतर खेळपट्टीकडे पाहत होता, म्हणून त्याला ‘नो-लूक सिक्स’ असे म्हटले गेले.
ब्रेविसचे षटकार इतके दणदणीत होते की चेंडू २ वेळा स्टेडियमच्या बाहेर गेला. षटकारांच्या हॅटट्रिकनंतर हार्डीने पुढचा चेंडू वाईड टाकला. यानंतर ब्रेविसने अखेरच्या चेंडूवर पण गगनचुंबी षटकार खेचला आणि एका षटकात २७ धावा केल्या. डेवाल्ड ब्रेविसच्या या फटकेबाजीच्या जोरावर आफ्रिकेने १७२ धावा केल्या. ब्रेविसशिवाय आफ्रिकेचा एकही फलंदाज अर्धशतकापर्यंत पोहोचू शकला नाही.
डेवाल्ड ब्रेविसच्या या षटकारांचे व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.