ऑलिम्पिक पदकासह भारतीय बॅडमिंटन विश्वाला नवा आयाम देणाऱ्या ‘फुलराणी’ सायना नेहवालच्या कारकीर्दीवर आधारित चित्रपटाची निर्मिती होणार आहे. विशेष म्हणजे ‘तारे जमीं पर’ या राष्ट्रीय पुरस्कारविजेत्या चित्रपटाचे मराठमोळे दिग्दर्शक अमोल गुप्ते हा चित्रपट तयार करणार आहेत. चित्रपटात सायनाची भूमिका साकारण्यासाठी दीपिका पदुकोण, आलिया भट या अभिनेत्रींची नावे चर्चेत आहेत. अमोल गुप्ते सायनाच्या कारकीर्दीवर चित्रपटाची निर्मिती करणार असून, पुढच्या वर्षीपासून या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होणार असल्याची माहिती सायनाचे वडील हरवीर सिंग यांनी दिली. गुप्ते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सायना आणि तिच्या कुटुंबीयांची हैदराबाद येथे भेट घेतली. हा चित्रपट तयार करण्यासाठी गुप्ते यांनी बंगळुरूस्थित कंपनीकडून स्वामित्वहक्क घेतले आहेत.‘‘चित्रपटात सायनापेक्षा बॅडमिंटनला प्राधान्य मिळाल्यास आम्हाला अधिक आनंद होईल. चित्रपटाविषयी सायना उत्साहित आहे. युवा खेळाडूंनी प्रेरणा घेऊन बॅडमिंटनकडे वळावे यादृष्टीने हा चित्रपट तयार व्हावा अशी सायनाची इच्छा आहे,’’ असे हरवीर सिंग यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 18th Dec 2015 रोजी प्रकाशित
सायनाच्या कारकीर्दीवर चित्रपट
‘फुलराणी’ सायना नेहवालच्या कारकीर्दीवर आधारित चित्रपटाची निर्मिती होणार आहे.
Written by झियाऊद्दीन सय्यद

First published on: 18-12-2015 at 05:43 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Film on saina nehwal career