दक्षिण कोरियातील इनचॉन येथे सुरू असलेल्या चौथ्या आशियाई इन्डोअर कबड्डी स्पर्धेत पुरुष आणि महिला गटात भारत आणि इराण यांच्यात अंतिम मुकाबला रंगणार आहे. पुरुष विभागाच्या शेवटच्या साखळी लढतीत भारताने इराणवर ४१-२८ असा विजय मिळवला. या स्पर्धेत पाकिस्तान संघ अनुपस्थित असल्याने पुरुष गटाची स्पर्धा पूर्ण साखळी पद्धतीने खेळवण्यात आली. भारत यामध्ये अपराजित ठरला. मध्यंतरापर्यंत २५-१० अशी मोठी आघाडी घेणाऱ्या भारताने नंतर ही आघाडी कायम राखत विजय साकारला. संपूर्ण साखळी पद्धतीने झालेल्या या स्पर्धेत भारताने पहिले तर इराणने दुसरे स्थान पटकावले. यजमान दक्षिण कोरियाने तिसरे स्थान मिळवले. बुधवारी सुवर्णपदकासाठी भारत आणि इराण यांच्यात सुवर्णपदकासाठी लढत रंगणार आहे.
महिलांच्या उपांत्य फेरीच्या लढतीत भारताने थायलंडचा ७९-२९ असा धुव्वा उडवला. मध्यंतरालाच ४१-१० अशी भक्कम आघाडी घेत भारताने विजयाची पायाभरणी केली. अंतिम लढतीत भारताची लढत इराणशी होणार आहे. इराणने यजमान दक्षिण कोरियाला ५५-२९ असे नमवले. कोलकाता येथे झालेल्या जागतिक महिला कबड्डी स्पर्धेत इराणने भारताला कडवी लढत दिली होती. सुवर्णपदकासाठी होणाऱ्या या मुकाबल्यातही इराण भारतासमोर तगडे आव्हान उभे करण्याची शक्यता आहे.