भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतवर जगभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. मँचेस्टर कसोटीच्या दुसऱ्या दिवशी दुखापत असूनही ऋषभ पंत फलंदाजीसाठी उतरला. पंतची जिद्द पाहून संपूर्ण जगाने त्याच्या धाडसाचे कौतुक केले. नीट चालताही येत नसताना मैदानावर उतरत त्याने आपलं अर्धशतक पूर्ण केलं आणि भारताच्या धावांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिल. चाहत्यांपासून क्रिकेट तज्ज्ञांपर्यंत सर्वांनी ऋषभ पंतला सलाम केला, पण इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटूने पंतच्या दुखापतीला नाटक म्हटलं आहे.

इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू डेव्हिड लॉईडने ऋषभ पंतच्या दुखापतीबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. लॉईड म्हणाले की, पंतच्या दुखापतीबद्दल अतिशयोक्ती केली जात आहे, ही दुखापत तितकीही गंभीर नाहीये.

डेव्हिड लॉयडने टॉक स्पोर्ट क्रिकेटशी बोलताना ऋषभ पंतच्या दुखापतीबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य करत म्हटलं, “माझ्या पायाला कधीही मेटाटार्सल दुखापत झालेली नाही, जी कदाचित पायाच्या काही भागात होते. अँडी रॉबर्ट्सच्या गोलंदाजीवर माझा हात मोडला होता आणि एकदा माझ्या गालाचं हाडही मोडलेलं, त्यामुळे मी त्यावेळी फलंदाजी करू शकलो नाही. पण माझ्या हाताच्या बोटाला दुखापत झाली होती, तेव्हा मी खेळत होतो.”

पुढे लॉयड म्हणाले, “पंतला खूप वेदना होताना दिसत आहेत, पुन्हा फलंदाजीसाठी येणं हे धाडसाचं काम होतं. मी आज त्या लिजेंड्स लाऊंजमध्ये होतो आणि बहुतेक सगळ्यांचं मत होतं, ‘तो दुखापतीचं नाटक करतोय. एवढी गंभीर दुखापत नसावी. पायऱ्यांवरून खाली उतरतानाही त्याने मुद्दाम वेळ घेतला.’ काही जण तर म्हणाले, ‘त्याला टाइम आऊट द्यायला हवा होता.'”

डेव्हिड लॉईडच्या या विधानावरून असं दिसून येतंय की तो आणि इतर इंग्लिश चाहते पंतच्या दुखापतीला नाटक असल्याचे म्हणत आहेत. पहिल्या दिवशी क्रिस वोक्सच्या चेंडूवर रिव्हर्स स्विप खेळताना ऋषभ पंतच्या पायाला दुखापत झाली. शॉट खेळत असताना चेंडू त्याच्या पायाला लागला आणि त्यानंतर त्याचा अंगठा फ्रॅक्चर झाला. पंतला चालतानाही त्रास होत होता आणि त्याला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आलं. पण इंग्लंडच्या चाहत्यांच्या मते पंत नाटक करत आहे.

डेव्हिड लॉयड म्हणाले की, “जर एखाद्या खेळाडूला पंतसारखी दुखापत झाली तर पर्यायी खेळाडूसाठी नियम असायला हवा. लॉईड म्हणाले, ‘मी अतिरिक्त रनर असावा या नियमाच्या बाजूने नाही, परंतु अशा दुखापतीसाठी बदली खेळाडूचा (लाईक अलाईक रिप्लेसमेंट) नियम असायला हवा. हो, फिरकी गोलंदाजाने फलंदाजाची जागा घेऊ नये.”