क्रिकेटपटू व पंचांकडून सामन्यांसंदर्भात माहिती मिळवून ती सट्टेबाजांना पुरवणाऱ्या अभिनेता विंदू दारासिंग याने मुंबई इंडियन्सचा गोलंदाज हरभजनसिंग यालाही ‘फिक्सिंग’च्या जाळय़ात ओढण्याचा प्रयत्न केला होता. भेटवस्तू व काही अप्रत्यक्ष ऑफर देऊनही ‘भज्जी’ने त्याला दाद दिली नाही, असे पोलीस तपासात उघड झाले आहे.
विंदू पाकिस्तानी पंच असद रौफ याच्याकडून खेळपट्टीबाबतची माहिती मिळवत असे. तर गुरुनाथकडून संघाची रणनीती, फलदांजी कोण करणार, नाणेफेकीचा कौल, खेळाडूंचा फिटनेस आदीबाबत माहिती घेऊन सट्टेबाजांना देत असे. गेल्या वर्षी त्याची गुरुनाथची ओळख झाली आणि त्याने या मोसमात गुरुनाथला सट्टेबाजीच्या जाळ्यात ओढले. हरभजनसिंग विंदूचे पुढचे सावज होते. ‘विंदू अनेक खेळाडूंशी बोलायचा. हरभजनशीही तो बोलत होता,’ अशी माहिती सहपोलीस आयुक्त (गुन्हे) हिमांशू रॉय यांनी दिली. हरभजनला जाळ्यात ओढण्यासाठी त्याने मध्यस्थ वापरले, भेटी घेऊन अप्रत्यक्ष काही ऑफर दिल्या, तसेच काही भेटवस्तू पाठविण्याचाही प्रयत्न केला. पण हरभजन त्याच्या गळाला लागला नाही, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl match fixing match fixer had a plan to trap harbhajan singh too