इंग्लंड संघाचे प्रशिक्षक अशोक दास यांना विश्वास

विश्वचषकामुळे कबड्डीचा चांगल्या पद्धतीने विकास आणि प्रसार होईल. त्यामुळे हा विश्वचषक ऑलिम्पिक प्रवेशासाठी भक्कम पाया ठरू शकतो, असा विश्वास इंग्लंडचे विद्यमान प्रशिक्षक अशोक दास यांनी व्यक्त केला.

‘‘सर्व कबड्डीप्रेमींना हा खेळ ऑलिम्पिकमध्ये खेळला जावा असे वाटते. यापूर्वीही यासाठीचे प्रयत्न झाले. १९३६मध्ये झालेल्या बर्लिन ऑलिम्पिकमध्ये कबड्डीचे प्रदर्शनीय सामने झाले होते, पण सध्याच्या घडीला कबड्डीची प्रगती पाहता या खेळाला चांगले भवितव्य आहे असे दिसते. या विश्वचषकातील सहभागी देशांमध्ये ही स्पर्धा पाहिली जाईलच, पण त्या देशांशीसंबंधित देशांमध्येही हा खेळ पोहोचेल,’’ असे दास यांनी सांगितले.

दास हे सध्याच्या घडीला युरोपामध्ये कबड्डीच्या प्रसाराचे काम करत आहेत. इंग्लंडच्या संघाला तर ते प्रशिक्षण देतातच, पण त्याचबरोबर पोलंड, मोक्सिको, इटली यांसारख्या देशांनाही कबड्डीचे मार्गदर्शन करत आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळे केनियाही कबड्डीशी जोडला गेला आहे.

‘‘प्रो कबड्डी लीगमुळे हा खेळ घराघरांमध्ये पोहोचला. या लीगमुळे खेळाचा प्रसार होण्यासाठी मोलाची मदत झाली. खेळ तोच आहे, पण या लीगने ज्या पद्धतीने कबड्डीचा चेहरामोहरा बदलला आहे, ते पाहिल्यावर डोळे दिपतात. हीच का ती जुनी कबड्डी, असा प्रश्नही काही जणांना पडला असेल. या लीगच्या माध्यमातून खेळाचे जे सादरीकरण झाले ते अप्रतिम असेच आहे. ही लीग प्रसिद्ध झाली. त्यानंतर आता कबड्डी विश्वचषकाकडे फार मोठा जनसमुदाय वळला आहे. या गोष्टीचा फायदा ऑलिम्पिकसाठी नक्की होऊ शकतो,’’ असे दास यांनी सांगितले.

ऑलिम्पिक प्रवेशाबाबत ते पुढे म्हणाले की, ‘‘सध्याच्या घडीला ३३ देशांनी आंतरराष्ट्रीय कबड्डी महासंघामध्ये नोंदणी केली आहे. विश्वचषकानंतर आणखी ३-४ संघ कबड्डी महासंघाशी जोडले जातील. त्यानुसार टोकियोमध्ये होणाऱ्या आगामी ऑलिम्पिकपर्यंत आम्ही जवळपास ५० देशांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. हे शक्य झाले तर २०२४च्या ऑलिम्पिकमध्ये कबड्डी आपल्याला दिसू शकेल. आमच्याकडे अजून जवळपास सात वर्षांचा कालावधी नक्कीच आहे. या कालावधीमध्ये बऱ्याच देशांना कबड्डीशी जोडण्याचा आमचा प्रयत्न असेल, त्याचबरोबर कबड्डीची लोकप्रियता जास्त देशांमध्ये झाल्यास त्याचाही ऑलिम्पिक प्रवेशासाठी आम्हाला फायदा होऊ शकतो.’’

काही देशांमध्ये कबड्डीच्या प्रचाराचा प्रयत्न तुम्ही करत आहात. यासाठी कोणते देश महत्त्वाचे ठरू शकतात, या प्रश्नाला उत्तर देताना दास म्हणाले की, ‘‘ज्या देशांमध्ये चांगले खेळाडू तयार आहेत, त्या देशांवर आमची नजर आहे. इंग्लंड, पोलंड, अमेरिका, केनियासारख्या देशांना आम्ही लवकर विश्वचषकात आणू शकलो, कारण त्या देशांमध्ये खेळाडू तयार होतात. त्या खेळाडूंना फक्त कबड्डी शिकवावी लागते. या देशांमध्ये जास्त करून फुटबॉल, रग्बीसारखे खेळ खेळले जातात. कबड्डीमध्ये ताकद आणि चपळता लागते. या खेळाडूंमध्ये ताकद असते, पण त्यांना खेळाचे नियम समजावणे आणि अधिक चपळ करणे हे आमचे काम आहे. या देशांमध्ये जर शालेयस्तरापासून आम्ही कबड्डी सुरू केली असती तर त्यांना विश्वचषकामध्ये येण्यास फार वेळ लागला असता. त्यामुळे आम्ही थेट तयार खेळाडूंना घेऊन संघ बनवला आणि विश्वचषकात त्यांना उतरवू शकलो.’’

युरो कबड्डी लीगचे स्वप्न

युरोपमध्ये जशी फुटबॉल लीग होते, तशीच कबड्डीची लीग सुरू करण्याचा माझा मानस आहे. त्यादृष्टीने विविध देशांमध्ये कबड्डीचा प्रसार सुरू आहे. युरो कबड्डी लीग सुरू झाल्यास त्याचा ऑलिम्पिक प्रवेशासाठीही फायदा होऊ शकतो. भारतापेक्षा युरोपातील खेळाडूंमध्ये ताकद आणि तंदुरुस्ती जास्त आहे. युरोपियन देशांतील खेळाडूंना जर सातत्याने सराव करायला मिळाला तर ते भारतालाही कडवी झुंज देऊ शकतील.