राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या वेळी झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप असलेले पुण्याचे खासदार सुरेश कलमाडी हे आशियाई अ‍ॅथलेटिक्स महासंघाच्या अध्यक्षपदासाठी पुन्हा उभे राहणार असल्याचे समजते.
कलमाडी हे महासंघाचे विद्यमान अध्यक्ष असून सन २००० पासून ते या पदाच्या खुर्चीत आहेत. एक जुलै रोजी येथे ही निवडणूक होणार आहे. महासंघाचे उपाध्यक्ष ब्रिगेडीअर दहलान जुम्मान अल हमाद हेही अध्यक्षपदासाठी उभे राहणार आहेत. कलमाडी यांची यापूर्वी दोन वेळा अध्यक्षपदावर बिनविरोध निवड झाली आहे.
याबाबत महासंघाच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले, कलमाडी यांनी अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर अनेक विविध उपक्रम सुरू केले आहेत. त्यांनी आशियाई ग्रां.प्रि. स्पर्धा, आशियाई ऑल स्टार स्पर्धा, आशियाई युवा स्पर्धा आदी अनेक स्पर्धा नव्याने सुरू केल्या आहेत. त्यामुळे त्यांना ही निवडणूक जिंकण्याची खात्री वाटत आहे. ४५ देशांचे प्रतिनिधी या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजाविणार आहेत.