आठवडय़ाची मुलाखत : संदीप तोमर आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू
ऑलिम्पिक पात्रता फेरीच्या विश्व अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या संदीप तोमरने कांस्यपदकाला गवसणी घालत ऑलिम्पिकसाठी पात्रतेचे निकष पूर्ण केले. पहिल्यांदाच ऑलिम्पिकची वारी करायला मिळणार असल्याने संदीप आनंदी आहे. पण दुसरीकडे त्याला या जबाबदारीची जाणीवही आहे. कारण ऑलिम्पिक पदकाचे ध्येय त्याने उराशी बाळगले असले तरी त्यासाठी लागणाऱ्या अथक मेहनतीची कल्पना आहे. संदीपने हा विजय, ऑलिम्पिक पात्रता, यापुढची रणनीती याबाबत लोकसत्ताशी खास बातचीत केली.
* पहिल्यांदाच ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहेस, आता तुझ्या काय भावना आहेत?
ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते, तसे ते माझेही होते. आता ते सत्यात उतरले आहे. या गोष्टीचा मला आनंद आणि अभिमान आहे. पण ऑलिम्पिकमध्ये खेळताना सर्वस्व पणाला लावावे लागणार आहे. त्यामुळे आतापासून मी ऑलिम्पिकच्या तयारीला लागलो आहे.
* तुला या स्पर्धेसाठी पाठवताना बराच गदारोळ झाला. तुला या स्पर्धेला पाठवू नये, अशी मागणी काही जणांनी केली होती. या साऱ्या गोष्टींमुळे तुझे लक्ष विचलित झाले नाही का?
नक्कीच नाही. कारण खेळणे हे माझे काम आहे. माझ्याबद्दल कोण काय बोलते, याच्याशी मला घेणेदेणे नाही. मी या साऱ्या प्रकरणात शांतच होतो आणि तेच योग्य आहे. त्यामुळेच मला खेळावर लक्ष केंद्रित करता आले आणि निकाल साऱ्यांसमोर आहेच.
* ऑलिम्पिकची तयारी सुरू केली आहेस का?
हो नक्कीच. कारण ऑलिम्पिक पात्र होण्याचे स्वप्न मी पाहिले होते ते सत्यात उतरले. आता ऑलिम्पिक पदकाचे स्वप्न मी पाहिले आहे. त्यामुळे हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवणे, हेच माझे मुख्य ध्येय आहे. ऑलिम्पिक पदक पटकावणे, ही साधी गोष्ट नक्कीच नाही, याची जाणीवही मला आहे. त्यासाठी मला अथक मेहनत करावी लागेल, याची कल्पनाही आहे. त्यासाठी मी स्वत:ला झोकून दिले आहे. दिवस-रात्र फक्त पदकाचाच ध्यास मी घेतला आहे.
* तू ५७ किलो वजनी गटात खेळतोस. या गटात ताकद जास्त लागते की तंत्र चांगले असावे लागते?
कुस्ती हा फक्त ताकदीचा खेळ आहे, असा समज जनमानसात रूढ आहे, पण ते पूर्ण सत्य नाही. कुस्तीमध्ये आणि खास करून माझ्या गटात खेळताना ताकद तर लागतेच, पण त्याचबरोबर तंत्र, तंदुरुस्तीही अधिक लागते. त्याचबरोबर हा खेळ आक्रमक वाटत असला तरी कायम डोके शांत ठेवावे लागते. डोके शांत असेल तरच तुम्ही योग्य ती रणनीती खेळताना आखू शकता आणि त्याची अंमलबजावणीही करू शकता. त्यामुळे डोके शांत ठेवण्यासाठी मी नियमित योगा करतो.
* या क्षेत्रात तुझे आदर्श कोण आणि त्यांनी तुला काय सल्ला दिला?
सुशील कुमार आणि योगेश्वर दत्त हे माझे आदर्श आहेत. आशियाई स्पर्धेच्या उपांत्य फेरीत मला चांगलीच झुंज द्यावी लागली होती. त्या सामन्यात माझ्या कच्च्या दुव्यांबाबत सुशील यांनी मला काही सल्ले दिले, या सल्ल्यांचा ऑलिम्पिकसाठी नक्कीच उपयोग होईल.