जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर आरूढ झाल्यावर भारताच्या सायना नेहवालचे मनोबल कमालीचे उंचावले आणि त्याचा प्रत्यय गुरुवारच्या तिच्या खेळातही दिसून आला. मलेशिया खुल्या टेनिस स्पर्धेत हाँगकाँगच्या पुई यिन यिपला पराभूत करून सायनाने उपांत्यपूर्व फेरीत स्थान निश्चित केले आहे.
स्पर्धेत अव्वल मानांकित असलेल्या २२ वर्षीय सायनाने यिपचा २१-१२, २१-०९ असा अवघ्या अध्र्या तासात फडशा पाडला. पहिल्या गेममध्ये सायना २-६ अशी पिछाडीवर होती, त्यानंतर तिने जोरदार आक्रमण करत यिपशी ९-९ अशी बरोबरी केली आणि मग सायनाने मागे वळून पाहिलेच नाही.  तिने पहिला गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्ये तर सायनाचेच वर्चस्व पाहायला मिळाले.
पुरुषांमध्ये पी. कश्यपचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. कश्यपला डेन्मार्कच्या सहाव्या मानांकित जान ओ जोर्गेनसेनने २१-१७, २१-१४ असे पराभूत केले. ‘पहिल्या फेरीच्या वेळी माझ्या उजव्या पायाला दुखापत झाली होती. पण तरीही मी दुसऱ्या फेरीत खेळलो आणि मला पराभवाचा सामना करावा लागला. दुखापतीमुळे मला सर्वोत्तम खेळ करता आला नाही’, असे कश्यपने सामन्यानंतर सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Malaysia open saina storms into quarter finals