पोलंडचा कर्णधार मिखाल स्पिझकोचे मत

दोन वर्षांपूर्वी आमची कबड्डीशी ओळख झाली. हा खेळ पाहिल्यावर आम्हाला तो रंजक आणि सोपा वाटला. आम्ही हा खेळ सहज खेळू शकतो, असे वाटले. पण प्रत्यक्षात खेळताना मात्र हा खेळ दिसतो तेवढा सोपा नसल्याचे जाणवले. कबड्डी पाहण्यापेक्षा खेळणे फार कठीण आहे, असे मत पोलंडचा कर्णधार मिखाल स्पिझकोने व्यक्त केले.

पोलंडने शुक्रवारी अमेरिकेचा धुव्वा उडवला. त्याचबरोबर विश्वचषकात प्रथमच ७५ गुण कमावत विश्वविक्रमाला गवसणी घातली. याबाबत मिखाल म्हणाला की, ‘‘विश्वविक्रमाबाबत मला कोणतीही कल्पना नाही. पण आम्ही चांगला खेळ केला आणि यापुढेही करण्याचा प्रयत्न करू. चांगला खेळ करणे आमच्या हातामध्ये आहे, अन्य गोष्टींकडे आम्ही जास्त लक्ष देत नाही.’’

कबड्डीबाबत मिखाल म्हणाला की, ‘‘मी अमेरिकन फुटबॉल खेळायचो. दोन वर्षांपूर्वी भारताचे अभिषेक शर्मा  पोलंडमध्ये कबड्डीच्या प्रसारासाठी आले असताना त्यांनी आम्हाला या खेळाची माहिती दिली आणि आम्ही कबड्डी खेळायला लागतो. त्यानंतर मी प्रो-कबड्डी लीगमध्ये बंगळुरू बुल्स संघामध्ये होते. या सर्व गोष्टींचा कबड्डी शिकण्यासाठी फायदा झाला.’’

पोलंडमधील कबड्डीच्या प्रसाराबद्दल मिखाल म्हणाला की, ‘‘हा खेळ रग्बी आणि अमेरिकन फुटबॉलच्या जवळ जाणारा आहे. त्यामुळे फार कमी वेळात कबड्डीला चांगली प्रसिद्धी मिळत आहे. सध्याच्या घडीला तीन नोंदणीकृत क्लब पोलंडमध्ये आहेत. पण या विश्वचषकानंतर यामध्ये लक्षणीय वाढ अपेक्षित आहे.’’

कबड्डी महासंघाची स्थापना करणार

सध्याच्या घडीला पोलंडमध्ये कबड्डी फाऊंडेशन आहे, पण महासंघ नाही. विश्वचषकानंतर आम्ही महासंघाची स्थापना करणार आहोत. महासंघाची स्थापना झाल्यावर आम्हाला सरकारकडून मदत मिळू शकते. सध्या आम्ही तायक्वांडोच्या मॅटवर सराव करतो. पण महासंघ झाल्यास सरकार आम्हाला कबड्डीची मॅट उपलब्ध करून देऊ शकेल.

पोलंडमधील बरॅखकबड्डीसारखाच

पोलंडमध्ये लहान मुलांच्या मनोरंजनासाठी खेळला जाणारा ‘बरॅख’  कबड्डीच्या जवळपासचा वाटतो. त्याची कोणतीही स्पर्धा होत नाही. यामध्ये एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला स्पर्श करून बाद करते, त्यानंतर दुसरी व्यक्ती तिसऱ्या व्यक्तीला बाद करण्यासाठी सरसावते (भारतातल्या पकडा-पकडीप्रमाणे) हा खेळ लहानपणी खेळल्यामुळे आम्ही अल्पावधीत कबड्डीच्या जवळ जाऊ शकलो.

अमेरिकन फुटबॉलपेक्षा कबड्डी अवघड

अमेरिकन फुटबॉलमध्येही बचाव करायचा असतो, पण तिथे जागा जास्त असते. त्यामुळे चुका कमी होऊ शकतात. पण कबड्डीमध्ये त्या तुलनेत बचाव करताना फार कमी जागा मिळते. त्यामुळे चुका जास्त होऊ शकतात. कबड्डीसारख्या खेळाचा पाच सेकंदांमध्येही नूर पालटू शकतो. त्यामुळे कबड्डी अमेरिकन फुटबॉलपेक्षा जास्त अवघड आहे.