Asia Cup 2025 Mohammad Nabi Shocked by Dunith Wellalage Father Death: आशिया चषक २०२५ मध्ये श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्यादरम्यान श्रीलंकन खेळाडूसाठी वाईट बातमी आली. श्रीलंकेचा युवा खेळाडू दुनिथ वेलाल्गेच्या वडिलांचं अचानक ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. सामन्यादरम्यान दुनिथ वेलाल्गेच्या गोलंदाजीवर मोहम्मद नबीने ५ षटकार लगावत वादळी खेळी केली होती. सामन्यानंतर नबीला त्याच्या वडिलांच्या मृत्यूची बातमी कळताच त्याला धक्का बसला, याचा व्हीडिओ देखील समोर आला आहे.

श्रीलंकेने चांगली फलंदाजी करत अफगाणिस्तानविरूद्ध सामन्यात ६ विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह श्रीलंकेचा संघ सुपर फोरसाठी पात्र ठरला. पण श्रीलंका संघासाठी हा आनंद मात्र क्षणिक ठरला. सामन्यानंतर श्रीलंकेचे कोच सनथ जयसूर्या यांनी दुनिथला बोलावून त्याला वडिलांच्या निधनाची बातमी दिली.

नबीने वेलाल्गेच्या २०व्या षटकात लगावलेले ५ षटकार

अफगाणिस्तानचा सर्वात अनुभवी खेळाडू असलेल्या नबीने त्याच्या संघासाठी उत्कृष्ट कामगिरी केली. त्याने फक्त २२ चेंडूत ६० धावा केल्या, ज्यामध्ये वेलाल्गेने टाकलेल्या शेवटच्या षटकात पाच षटकारांचा समावेश होता. मोहम्मद नबी अखेरच्या षटकात फलंदाजी करता होता. त्याने सलग तीन षटकार लगावत षटकारांची हॅटट्रिक केली. यानंतर नो बॉल टाकल्यानंतर पुन्हा सलग दोन षटकार नबीने खेचले. यानंतर अखेरच्या चेंडूवर नबी धावबाद झाला. पण तोपर्यंत वेलाल्गेच्या षटकात नबीने ३२ धावा केल्या होत्या.

सामन्यानंतर माघारी जात असताना पत्रकारांनी मोहम्मद नबीला वेलाल्गेच्या वडिलांच्या निधनाची बातमी दिली, हे ऐकताच नबीला धक्का बसला. रिपोर्टरने नबीला सांगितलं की, “दुनिथ वेलाल्गेच्या वडिलांचं निधन झालंय.” चकित होत नबीने विचारल, “वडिलांचं कसं काय?” ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचं नबीला त्याने सांगितलं. सामन्यादरम्यान त्यांचं निधन झालं पण सामन्यानंतर त्याला निधनाची बातमी दिली गेल्याचं रिपोर्टने नबीला सांगितलं.

त्यानंतर काही वेळातच, नबीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याच्या वडिलांना श्रद्धांजली वाहिली आणि या कठीण प्रसंगात खंबीर राहा असंही नबी या पोस्टमध्ये म्हणाला आहे. नबीने या युवा फिरकीपटूचा त्याच्या वडिलांसोबतचा फोटोही शेअर केला.

प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने २० षटकांत १६९ धावा केल्या. प्रत्युत्तरात, श्रीलंकेने ८ चेंडू शिल्लक असताना ४ गडी गमावून १७० धावा करत विजय निश्चित केला. या विजयासह श्रीलंकेने ब गटात अव्वल स्थान मिळवलं आणि सुपर फोर साठी पात्र ठरला. श्रीलंकेचा सामना आता शनिवार, २० सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर बांगलादेशशी होईल.