पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू मोहम्मद वाजने हॅटट्रिक घेत टी-२० तिरंगी मालिकेत संघाला विजय मिळवून दिला आहे. आशिया चषकापूर्वी पाकिस्तानने टी-२० तिरंगी मालिका जिंकून स्पर्धेसाठी सज्ज असल्याचं दाखवून दिलं आहे. पाकिस्तान, युएई आणि अफगाणिस्तान यांच्यात टी-२० तिरंगी मालिका खेळवली जात होती. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात अंतिम फेरी खेळवली गेली आणि ७५ धावांनी विजय मिळवला.
अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात डावखुरा फिरकी गोलंदाज नवाजने हॅटट्रिक घेऊन खळबळ उडवून दिली. या सामन्यात नवाजने पहिल्या ७ चेंडूत ही हॅटट्रिक घेतली आणि अफगाणिस्तानला गुडघे टेकायला भाग पाडलं. यासह, तो टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हॅटट्रिक घेणारा तिसरा पाकिस्तानी गोलंदाज बनला.
अंतिम सामना रविवार, ७ सप्टेंबरला शारजाह येथे अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात झाला, ज्यामध्ये प्रथम पाकिस्तानने कशीबशी चांगली धावसंख्या उभारली आणि नंतर नवाजने अफगाणिस्तानच्या फलंदाजांना एकामागून एक आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले.
टी-२० सामन्यात हॅटट्रिक घेणारा पाकिस्तानचा तिसरा गोलंदाज
टी-२० तिरंगी मालिकेत सातत्याने चांगली गोलंदाजी करणाऱ्या नवाजने अंतिम फेरीतही आपली लय कायम ठेवली. सहाव्या षटकात गोलंदाजी करण्यासाठी आलेल्या नवाजने पहिल्या ४ चेंडूत फक्त १ धाव दिली आणि नंतर शेवटच्या २ चेंडूत २ बळी घेतले. त्याने षटकाच्या पाचव्या चेंडूवर दरविश रसुलीला बाद केलं आणि त्यानंतर पुढच्या चेंडूवर अझमतुल्लाह उमरझाईला पॅव्हेलियनमध्ये धाडलं. यासह तो हॅटट्रिकच्या जवळ होता आणि पुढच्या षटकात गोलंदाजी करण्यासाठी आला आणि त्याने पहिल्याच चेंडूवर विकेट घेत हॅटट्रिक आपल्या नावे केली.
८ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर मोहम्मद हॅरिसने इब्राहिम झादरानला पायचीत केलं आणि यासह नवाजने त्याची हॅटट्रिक पूर्ण करून इतिहास रचला. टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हॅटट्रिक घेणारा नवाज तिसरा पाकिस्तानी गोलंदाज ठरला. यापूर्वी, फहीम अश्रफ (२०१७) आणि मोहम्मद हसनैन (२०१९) यांनी पाकिस्तानकडून हॅट्रिक घेतली होती. योगायोगाने, दोघांनीही श्रीलंकेविरुद्ध ही कामगिरी केली.
टी-२० सामन्यात ५ विकेट्स घेण्याचा पराक्रम
नवाजने हॅटट्रिक घेऊन थांबला नाही पुढच्या ३ चेंडूत त्याने चौथी विकेट घेतली. अशाप्रकारे, पहिल्या २ षटकात फक्त १ धाव देत नवाजने ४ विकेट घेतल्या. सामन्यातील त्याच्या शेवटच्या षटकात नवाजने अफगाणिस्तानचा कर्णधार रशीद खानला बाद केलं आणि सामन्यातील ५ बळी पूर्ण केले. त्याच्या ४ षटकात नवाजने १९ धावा देत ५ बळी घेतले. आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये एका डावात ५ बळी घेण्याची ही त्याची पहिलीच वेळ होती.
पाकिस्तानने अंतिम सामना जिंकण्यासाठी अफगाणिस्तानसमोर १४२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. पाकिस्तानची सुरुवातही चांगली झाली नव्हती आणि संघाने फक्त ७२ धावांवर ५ विकेट गमावल्या. अशा वेळी नवाज (२५) ने अद्भुत फलंदाजी करत डाव सांभाळला. पाकिस्तानी अष्टपैलू खेळाडूने प्रथम कर्णधार सलमान आघासोबत ४० धावांची भागीदारी केली आणि नंतर संघाला सामन्याच्या योग्य धावसंख्येपर्यंत नेलं. त्यानंतर नवाजने ५ बळी घेत अफगाण संघाचा पराभव केला.