Champions Trophy Mushfiqur Rahim Announces ODI Retirement: चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर काही संघांच्या दिग्गज खेळाडूंनी क्रिकेटला अलविदा केलं आहे. आता चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर थेट २०२७ मध्ये वनडे वर्ल्डकप खेळवला जाणार आहे. त्यामुळे सर्वच संघ आता चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर २०२७मधील वनडे वर्ल्डकपसाठी आपली संघबांधणी करणार आहे. दरम्यान बराच काळ हा फॉरमॅट खेळणाऱ्या एका संघाच्या खेळाडूने वनडे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या गट टप्प्यातूनच एकही सामना न जिंकता बाहेर पडलेला संघ बांगलादेश संघातील दिग्गज खेळाडूने निवृत्ती जाहीर केली. बांगलादेशचा यष्टिरक्षक-फलंदाज मुशफिकुर रहीमने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. १९ वर्षे खेळल्यानंतर त्याने या फॉरमॅटला अलविदा केला आहे. त्याने २००६ मध्ये झिम्बाब्वे विरुद्ध हरारे येथे वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

३७ वर्षीय मुशफिकुरने २४ फेब्रुवारीला न्यूझीलंडविरुद्ध चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये या फॉरमॅटमधील शेवटचा सामना खेळला होता. मात्र, २७ फेब्रुवारीला खरंतर तो अखेरचा पाकिस्तानविरुद्ध सामना खेळणार होता, मात्र पावसामुळे सामना रद्द करावा लागला.

मुशफिकुर रहीमने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत निवृत्ती जाहीर केली आहे. पोस्टमध्ये त्याने लिहिले की, “मी आजपासून एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत आहे. सर्व गोष्टींसाठी देवाचे आभार. जागतिक स्तरावर आमची कामगिरी मर्यादित असली तरी एक गोष्ट निश्चित आहे की मी जेव्हा जेव्हा माझ्या देशासाठी मैदानात उतरलो तेव्हा मी समर्पणाने आणि प्रामाणिकपणाने खेळलो आणि १०० टक्क्यांहून जास्त देण्याचा प्रयत्न केला.”

तो पुढे म्हणाला, “‘”गेले काही आठवडे माझ्यासाठी खूप आव्हानात्मक होते आणि मला जाणवले की हे माझं नशीब आहे. शेवटी, मी माझे कुटुंब, मित्र आणि चाहत्यांचे मनापासून आभार मानू इच्छितो ज्यांच्यासाठी मी १९ वर्षे क्रिकेट खेळलो.”

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये बांगलादेशची कामगिरी काही खास नव्हती. एकही सामना न जिंकता संघ गट टप्प्यातून बाहेर पडला. बांगलादेशने भारताविरुद्धच्या सामन्यासह मोहिमेला सुरूवात केली, ज्यामध्ये त्यांचा ६ विकेट्सने पराभव झाला. या सामन्यात मुशफिकुर रहीम गोल्डन डकवर बाद झाला. तर न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात मुशफिकुरला केवळ २ धावा करता आल्या. तर गट टप्प्यातील शेवटच्या सामन्यात बांगलादेशचा सामना पाकिस्तानशी होणार होता, मात्र पावसामुळे सामना रद्द झाला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mushfiqur rahim announces odi retirement after champions trophy exit of bangladesh with post bdg