शंभर वर्षांपूर्वीचा जुना क्लब अशी ओळख असलेल्या मोहन बागानवर ९ डिसेंबर रोजी ईस्ट बंगालविरुद्ध झालेल्या सामन्यात राडा केल्याप्रकरणी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) आय-लीग फुटबॉल स्पर्धेत दोन वर्षांसाठी बंदी घातली आहे.
मोहन बागानचे या मोसमातील सर्व सामने रद्द करण्यात आले असून त्यांच्यावर दोन वर्षांसाठी निलंबनाची कारवाई करण्याचा निर्णय आय-लीगच्या कार्यसमितीने शनिवारी सुनावला. ‘‘न्यायाधीश ए. के. गांगुली यांनी या सामन्यासंदर्भातील अहवाल २६ डिसेंबरला कार्यसमितीकडे सादर केला होता. त्यात मोहन बागान क्लबने आय-लीग आचारसंहितेतील २२व्या कलमाचे उल्लंघन केल्याचे नमूद करण्यात आले होते. या कलमानुसार या मोसमातील मोहन बागानचे सामने रद्द करण्यात आले असून पुढील दोन मोसमांसाठी त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे,’’ असे एआयएफएफच्या पत्रकात म्हटले आहे.
मोहनबागानला फेडरेशन चषक, भारतात होणाऱ्या बाद फेरीच्या स्पर्धा आणि अन्य स्पर्धामध्ये खेळण्याची परवानगी एआयएफएफने दिली आहे. आय-लीगच्या पहिल्या विभागीय संघांमध्ये मोहन बागानला थेट प्रवेश मिळणार नाही. त्यांना दुसऱ्या विभागीय संघांमध्ये होणारी स्पर्धा जिंकूनच पहिल्या विभागीय संघांमध्ये खेळावे लागणार आहे. त्यामुळे आय-लीग स्पर्धेत मोहन बागानचा संघ आता २०१५-१६ मोसमात खेळताना दिसेल.
या निर्णयाविरोधात मोहन बागानला जागतिक फुटबॉल महासंघ किंवा आशियाई फुटबॉल महासंघाकडे दाद मागता येणार नाही.
ईस्ट बंगालविरुद्धच्या सामन्यादरम्यान प्रेक्षकांनी गदारोळ घालण्यास सुरुवात केली. त्या वेळी प्रेक्षकांमधून भिरकावलेला दगड मोहन बागानचा खेळाडू सय्यद रहिम नाबी याच्या गालावर आदळला होता. त्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव मोहन बागानने मध्यंतरानंतर मैदानावर उतरण्यास नकार दिला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No respite for bagan suspended for two years from i league