PCB Chief Mohsin Naqvi Post: आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत रविवारी (२१ सप्टेंबर) भारत-पाकिस्तान यांच्यादरम्यान दुसरा सामना खेळला गेला. यावेळी पाकिस्तानचा फलंदाज साहिबजादा फरहानने अर्धशतक पूर्ण केल्यानंतर बंदुकीचं सेलिब्रेशन केलं होतं. तर गोलंदाज हरिस रौफने क्षेत्ररक्षण करत असताना वादग्रस्त हातवारे करून दाखवले होते. यामुळं क्रिकेट जगतातून पाकिस्तानी खेळाडूंवर टीका होत असतानाच आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षांनीही अशाच प्रकारची कृती केल्याची बाब समोर आली आहे.
सुपर ४ मध्ये पाकिस्तानी गोलंदाज हरिस रौफ याने जी वादग्रस्त कृती केली. त्याचप्रकारची कृती पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी केली आहे. मोहसीन नक्वी यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक आंतरराष्ट्रीय फूटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या फोटोतून त्यांनी भारताला डिवचण्याचा प्रयत्न केला.
मोहसिन नक्वी हे आशिया क्रिकेट परिषदेचेही प्रमुख आहेत. त्यांनी बुधवारी सदर पोस्ट शेअर करत भारत-पाकिस्तान वादात तेल ओतले. मोहसीन नक्वी यांच्यावर दुबईत होत असलेल्या आशिया चषक स्पर्धेत प्रमुख भूमिका आहे. जबाबदार व्यक्ती असतानाही त्यांनी हरिस रौफच्या वादग्रस्त कृतीची पुनरावृत्ती केली.
बुधवारी नक्वी यांनी ख्रिस्तियानो रोनाल्डोचा एक व्हिडीओ शेअर करत भारत-पाकिस्तान संघर्षावरून वाद निर्माण केला. पाकिस्तानने भारताची विमाने पाडली, या बिनबुडाच्या दाव्याला एक प्रकारे बळकटी देण्याचे काम त्यांचे क्रिकेटपटू आणि क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष करताना दिसत आहेत. २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर ७ मे रोजी भारताकडून ऑपरेशन सिंदूर राबवले गेले होते.
२१ सप्टेंबर रोजी दुबईच्या मैदानावर भारत-पाकिस्तान सामना सुरू असताना पाकिस्तानच्या खेळाडूंनी भारतीय खेळाडूंच लक्ष विचलित करण्याचा पूर्ण प्रयत्न केला. पण भारतीय खेळाडूंनी या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केलं आणि दिलेल्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला. सामन्यातील पहिल्या डावात साहिबजादा फरहानने अर्धशतक पूर्ण केल्यानंतर बंदुकीचं सेलिब्रेशन केलं. त्यानंतर क्षेत्ररक्षण करत असताना हरिस रौफने वादग्रस्त इशारे केले होते.
आशिया चषकात नाट्यमय घडामोडी
२०२५ चा आशिया चषक अनेक कारणांसाठी चर्चेत आहे. भारत-पाकिस्तान दरम्यान झालेल्या पहिल्या सामन्यानंतर भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करण्याचे टाळले. त्यानंतर पाकिस्तानने सामन्यानंतरच्या सादरीकरण समारंभावर बहिष्कार टाकला. दुसऱ्या सामन्यातही भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करणे टाळले.
मात्र दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानी खेळाडूंनी भारतीय खेळाडूंना डिवचल्यामुळे या सामन्यात बरीच गरमागरमी पाहायला मिळाली.