Kamran Akmal Statement: आशिया चषकात अंतिम सामना जिंकूनही भारतीय संघाने पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्या हस्ते करंडक घेण्यास नकार दिल्यानंतर आता पाकिस्तानचा जळफळाट होताना दिसत आहे. स्वतःच्या पराभवाचे शल्य लपविण्यासाठी पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू आता भारताविरोधात बरळू लागले आहेत. पाकिस्तानने यापुढे भारताविरोधात क्रिकेट खेळूच नये, अशी घोषणा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) तात्काळ करावी, असे आवाहन माजी क्रिकेटपटू कामरान अकमलने केले आहे.
कामरान अकमल एआरवाय न्यूजशी बोलताना म्हटले की, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने तात्काळ काही निर्णय घेणे आवश्यक आहे. आपण भारताविरोधात यापुढे अजिबात खेळणार नाही. हे जाहीर करा. आयसीसी काय कारवाई करते, तेही पाहू. इतके पुरावे असताना तुम्हाला आणखी काय हवे आहे? पण बीसीसीआयचा माणूसच सध्या आयसीसीचे नेतृत्व करत आहे. ते (जय शाह) काय यावर कारवाई करणार? त्यामुळे इतर बोर्डांनी एकत्र येऊन हे क्रिकेटमध्ये चालू देणार नाही, असे ठामपणे सांगितले पाहिजे.
क्रिकेटचा खेळ कुणाच्या घरात खेळला जात नाही. जर सर्वांनी त्यांच्याबरोबर (भारत) खेळण्यास नकार दिला तर त्यांना पैसाही मिळणार नाही, असेही कामरान अकमल म्हणाला.
कामरान अकमल पुढे म्हणाला, “या गोष्टी जितक्या लवकर नियंत्रणात येतील तितके सर्वांसाठी चांगले आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्या सहभागाशिवाय एक तटस्थ समिती स्थापन करण्यात यावी. त्यात ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंडचे सदस्य असावेत. आशिया चषकात जे झाले, त्यावर निर्णय घेण्याचा अधिकार या समितीला द्यावा.”
भारताकडून सातत्याने चुकीचे वर्तन केले जात आहे. या स्पर्धेत क्रिकेटचे भारतीय संघाने किती नुकसान केले ते आपण पाहिले. पीसीबी आणि एसीसीच्या अध्यक्षांनी अतिशय योग्य निर्णय घेतला आहे. तुम्ही करंडक घ्या किंवा घेऊ नका, पण तो अध्यक्षांच्या हस्तेच दिला जाणार. क्रिकेटच्या जगतामध्ये भारत हा मोठा विनोद बनला आहे.
श्रीमंत बोर्ड आहात म्हणून बदमाशी करू नका
कामरान अकमलने पुढे म्हटले, “तुम्ही जगातील श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहात म्हणून बदमाशी करू नका. क्रिकेट अशापद्धतीने खेळले जाणार नाही. जगात इतरही खेळ आहेत. पण तिथे असले प्रकार होत नाहीत. त्यामुळे जगातील तटस्थ क्रिकेट बोर्डांनी आता एकत्र यावे. माजी क्रिकेटपटू, क्रिकेट समालोचक आणि इतर लोक काय करतात ते पाहू. यावर कुणी काही बोलणार का?”
आशिया चषकाच्या हेतूलाच हरताळ
पाकिस्तानचा आणखी एक माजी क्रिकेटपटू बाजीद खान म्हणाला की, यातून जगाला कोणता संदेश दिला गेला? ही कधीही न संपणारी गोष्ट आहे. ही शत्रुत्वाची भावना, द्वेष आणखी वाढू शकतो. जो यापूर्वी कधीही दिसला नव्हता. तुम्ही करंडक घेण्यासही विरोध केला, मला वाटते असे यापूर्वी कधीही घडले नव्हते.
पीटीव्ही स्पोर्ट्सला दिलेल्या प्रतिक्रयेत बाजीद खान म्हणाला, “आशियातील सर्व देशांना एकत्र आणणे, हा आशिया कपचा उद्देशच होता. पण तुम्ही (भारत) म्हणता अमुक एकाच्या हातून करंडक घेणार नाहीत. पण एसीसीचे अध्यक्षपद हंगामी आणि फिरते आहे. आशिया चषकाच्या माध्यमातून सर्व संघाना एकत्र आणून खेळणे आणि उर्वरित जगाचा सामना करण्यासाठी त्यांना सज्ज करणे, हे आपले ध्येय होते. पण आता हे ध्येयच पराभूत झाले आहे. ही विचित्र परिस्थिती आहे.”