R Praggnanandhaa Defeats Magnus Carlsen: भारताचा १८ वर्षीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदने मोठी कामगिरी केली आहे. आर प्रज्ञानंदने स्टॅव्हॅन्गर येथील नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत मोठा विजय नोंदवला आहे. या स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत आर प्रज्ञानंदने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या मॅग्नस कार्लसनचा पराभव केला आणि या दिग्गज खेळाडूवर पहिला क्लासिकल विजय नोंदवला. गतवर्षी झालेल्या फिडे विश्वचषकात उपविजेता ठरलेल्या आर प्रज्ञानंद हा क्लासिकल बुद्धिबळात कार्लसनला पराभूत करणारा चौथा भारतीय खेळाडू आहे.

या विजयासह, प्रज्ञानंद तिसऱ्या फेरीअखेर 9 पैकी ५.५ गुणांसह नॉर्वे बुद्धिबळ २०२४ स्पर्धेत (Norway Chess 2024) मध्ये आघाडीवर आहे. तर, झालेल्या पराभवामुळे मॅग्नस कार्लसनची स्पर्धेत पाचव्या स्थानावर घसरण झाली आहे.

हेही वाचा – T20 WC 2024: हरमीत सिंह; रोहित शर्माचा मित्र, फिक्सिंगचा आरोप आणि ढवळून निघालेली कारकीर्द

तीन फेऱ्यांनंतर नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेतील खेळाडूंचे गुण
१. आर प्रज्ञानंद – ५.५
२. फॅबियो कारुआना – ५
३. हिकारू नाकामुरा – ४
४. अलीरेझा फिरोझा – ३.५
५. मॅग्नस कार्लसन – ३
६. डिंग लिरेन – २.५

१८ वर्षीय प्रज्ञानंदने जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनला त्याच्याच देशात पराभूत केले आहे. पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळताना प्रज्ञानंज्ञने गेल्या वर्षीच्या फिडे विश्वचषक विजेत्या कार्लसनचा निकराच्या लढतीत पराभव केला. यासह, भारतीय ग्रँडमास्टरने स्पर्धेच्या खुल्या विभागात आघाडी मिळवली आहे.

“कार्लसनने डिवचणारी सुरूवात केली होती. मी म्हटलं, त्याला निकराची लढत द्यायची आहे, नाहीतर तो काहीतरी वेगळं खेळला असता. माझी अजिबात हरकत नव्हती. आमची स्पर्धा सुरू होती आणि पुढे काय होतं हे पाहू.” असं प्रज्ञानंदने विजयानंतर इंडियन एक्सप्रेसला सांगितले.