भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. काहीच दिवसांनी विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत सर्वांनाच धक्का दिला. काही दिवसांच्या फरकांमध्ये क्रिकेटमधील अनेक दिग्गजांनी क्रिकेटच्या फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केल्या आहेत. दरम्यान रोहित शर्माने खास व्हीडिओ तयार करत अँजेलो मॅथ्यूजला निवृत्तीनंतरच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या २०२५-२७ च्या चक्राला सुरूवात झाली आहे. यातील पहिलाच सामना आजपासून म्हणजेच १७ जूनपासून श्रीलंका वि. बांगलादेश यांच्यात खेळवला जात आहे. हा सामना श्रीलंकेचा दिग्गज आणि अनुभवी खेळाडू अँजेलो मॅथ्यूज त्याच्या कसोटी कारकिर्दीतील अखेरचा कसोटी सामना खेळणार आहे.

श्रीलंका वि. बांगलादेश यांच्यातील कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी संघाकडून त्याला शुभेच्छा देण्यात आल्या. त्याचं कुटुंबही आजच्या सामन्यासाठी उपस्थित आहे. तर अँजेलो मॅथ्यूजने त्याच्या अखेरच्या कसोटीपूर्वी त्याच्या भावना व्यक्त केल्या. त्यानंतर श्रीलंकेच्या संघाने त्याला गार्ड ऑफ ऑनर देत मग सामन्याला सुरूवात झाली.

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने अँजेलो मॅथ्यूजला त्याच्या अखेरच्या सामन्यापूर्वी व्हीडिओ शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत. रोहित शर्माचा हा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. रोहित आणि मॅथ्यूज अंडर-१९ संघांपासून एकमेकांविरूद्ध खेळत आले आहेत.

रोहित शर्मा या व्हीडिओमध्ये म्हणाला, “अँजेलो, प्रदीर्घ अशा दिमाखदार कारकिर्दीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा! उमेदीच्या काळापासून अगदी आतापर्यंत आपण एकमेकांविरुद्ध खेळण्यासाठी उभे ठाकलो. श्रीलंकेला जिंकून देण्यासाठी तू नेहमीच आघाडीवर असायचास. तुझी खेळाप्रति निष्ठा, अतुलनीय योगदान नेहमीच स्मरणात राहील. श्रीलंकावासीयांना अभिमान वाटेल अशी तुझी कारकीर्द आहे.”

अँजेलो मॅथ्यूजपूर्वी रोहित शर्माने कसोटीतून निवृत्ती जाहीर केली. रोहितने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील पाचव्या कसोटी सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमधून स्वतःला वगळले. रोहितने कसोटी कर्णधार म्हणून कायम राहणार असल्याचे ऑस्ट्रेलिया मालिकेनंतरही म्हटले होते. पण निवड बैठकीच्या काही आठवड्यांपूर्वी त्याने अचानक निवृत्तीची घोषणा केली. रोहित एकदिवसीय सामने खेळताना दिसणार आहे.

रोहित शर्माच्या अनुपस्थितीत भारतीय संघ येत्या २० जूनपासून इंग्लंडविरूद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. रोहित शर्मानंतर आता शुबमन गिलला भारताच्या कसोटी संघाचे नेतृत्त्व करण्याची जबाबदारी देण्यात आले आहे.