इंग्लंडचा २०१४चा दौरा विराट कोहलीसाठी अत्यंत अपयशी ठरला. १, ८, २५, ०, ३९, २८, ०, ७, ६, २० या धावा सध्याचा कसोटी कर्णधार आणि धावांची टांकसाळ उघडणाऱ्या विराट कोहलीच्या असतील, यावर कुणाचा विश्वास बसणार नाही. दोन वर्षांपूर्वी कसोटी संघासाठी अयोग्य वाटणारा हा खेळाडू सध्या भारताच्या फलंदाजीचा कणा झाला. हा बदल नक्कीच एका रात्रीत घडलेला नाही. कोणत्याही टीकेला देदीप्यमान कामगिरीतूनच उत्तर द्यायचे, ही भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची खास शैली. कोहलीलाही त्याने याबाबत आपल्या अनुभवाच्या शिदोरीतून काही कानमंत्र दिले. त्यातूनच घडलेल्या या बदलाची कबुली विराटने कसोटी विजयानंतर दिली.
याबाबत कोहली म्हणाला की, ‘‘माझ्या खेळाविषयी किंवा तंत्राविषयी सचिनने मला काहीच सांगितले नाही; परंतु आपल्याबद्दल जे काही चांगले-वाईट लिहून येते, ते वाचायचे नाही, पाहायचे नाही, असा मोलाचा सल्ला त्याने मला दिला आणि त्याचाच मला फायदा झाला.’’
‘‘मी कसोटी क्रिकेटचा खेळाडूच नाही, अशी टीका माझ्यावर झाली; पण ही टीका माझ्यासाठी प्रोत्साहनपर ठरली. त्यानंतर मी माझ्या खेळावर अधिक लक्ष दिले. आता कर्णधार झाल्यावर फक्त संघाचाच विचार मी करत असतो. त्यामुळे काही वाचायला वेळच मिळत नाही,’’ असे त्याने पुढे सांगितले. मैदानात असभ्य वर्तन करणे, पत्रकारांना शिव्यांची लाखोली वाहणे, असे गैरवर्तन कोहलीने यापूर्वी बऱ्याचदा केले आहे; पण त्यानंतर त्याला मिळालेले सचिनचे मार्गदर्शन त्याच्यामध्ये मोठा बदल घडवते आहे.
आम्ही विजेत्यासारखेच खेळलो
‘‘आम्ही ही मालिका सहज जिंकलो, हे म्हणणे उचित ठरणार नाही. बऱ्याच वेळा आम्हीदेखील दडपणाखाली होतो. या विजयाचे श्रेय भारतीय संघाला द्यायला हवे. साऱ्यांनीच अथक मेहनत घेतली. प्रतिस्पर्धी फलंदाजांना दडपणाखाली आणले. अधिक संयम ठेवला. आमचा संघ अव्वल आहे, हे आम्ही दाखवून दिले. आम्ही विजेत्यासारखेच खेळलो,’’ असे कोहलीने सांगितले.
या वेळी चांगल्या खेळपट्टय़ा मिळाल्या
‘‘न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपेक्षा या वेळी खेळपट्टय़ा अधिक चांगल्या मिळाल्या. आम्ही चांगले क्रिकेट खेळलो. विजयासाठी अथक मेहनत घेतली. न्यूझीलंडच्या संघात फार अनुभवी खेळाडू नव्हते. रॉस टेलर आणि केन विल्यमसन यांनाच भारतात खेळण्याचा चांगला अनुभव होता; पण इंग्लंडकडे चांगले फलंदाज होते, त्यांच्या कामगिरीत सातत्य होते. त्यामुळे या मालिका विजयामुळे मी समाधानी आहे,’’ असे विश्लेषण कोहलीने या वेळी केले.
अॅडलेडचे शतकच सर्वोत्तम
‘‘ही माझी कसोटी क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या आहे; पण माझी ही सर्वोत्तम खेळी आहे, असे मी म्हणणार नाही, कारण अजून मालिकेतील एक सामना बाकी आहे; पण आतापर्यंत विचाराल तर मला अॅडलेडच्या दुसऱ्या डावातील खेळी सर्वोत्तम वाटते. ही खेळी दुसरी सर्वोत्तम असेल,’’ असे कोहलीने सांगितले.
मी कुणावर भाष्य करण्यास लायक नाही
‘‘मी फक्त माझ्या आणि संघाच्या कामगिरीवर लक्ष केंद्रित करतो. कुणावर भाष्य करण्यास मी लायक नाही. कुणाच्या तंत्राविषयी बोलण्याच्या स्थितीतही मी नाही,’’ असे कोहली म्हणाला.
बदल्याची भावना मनात नसते
‘‘इंग्लंडने गेल्या मालिकेत आम्हाला पराभूत केले असले तरी त्यांचा बदला वगैरे घेण्याचे माझ्या मनालाही शिवत नाही. या साऱ्या गोष्टी प्रेक्षकांसाठी मसालेदार असतात; पण या गोष्टींचा विचार मी कधीही करत नाही. मी फक्त खेळावर लक्ष केंद्रित करतो,’’ असे कोहलीने सांगितले.