Badminton Couple Saina Nehwal Parupalli Kashyap Announces Separation : भारताची प्रसिद्ध बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि तिचा पती भारतीय बॅडमिंटनपटू पारूपल्ली कश्यप विभक्त होत असल्याची माहिती सायना नेहवालने पोस्ट शेअर करत दिली आहे. सायना नेहवाल आणि पारूपल्ली कश्यप हे करियरच्या सुरूवातीपासून एकमेकांना ओळखतात आणि बॅडमिंटनच्या कोर्टवर दोघेही प्रेमात पडले होते. २०१८ मध्ये लग्न झाल्यानंतर आता हे बॅडमिंटनपटू जोडपं वेगळं होणार आहे.
सायना नेहवाल आणि पारूपल्ली कश्यप यांनी एकत्र बॅडमिंटनचे धडे गिरवले आहेत. सायना आणि कश्यप एकत्र खेळायचे. यादरम्यान त्यांची मैत्री झाली आणि ही मैत्री प्रेमात कशी खुलत गेलीॉ हे त्यांनाही कळलं नाही. एका दशकभराचा काळ एकमेकांना डेट केल्यानंतर, दोघांनीही १४ डिसेंबर २०१८ मध्ये लग्न केलं.
सायना नेहवाल इन्स्टाग्राम पोस्ट
सायना नेहवालने इन्स्टाग्रामवर अचानक पोस्ट शेअर सर्वांनाच धक्का दिला. सायनाने या पोस्टमध्ये लिहिलं आहे, “कधी कधी आयुष्य आपल्याला वेगळ्या वळणावर घेऊन जातं. बराच विचार केल्यानंतर आता कश्यप पारूपल्ली आणि मी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही दोघेही स्वतःसाठी आणि एकमेकांसाठी स्थैर्य, यश आणि शांततापूर्ण जीवन जगणं निवडत आहोत.”. या प्रवासात पुढे जाताना मी चांगल्या शुभेच्छा देत सर्व छान आठवणींसाठी आभार मानते.”
सायना आणि ३८ वर्षीय कश्यप गेल्या ७ वर्षांपासून लग्नबंधनात होते. दोघांनीही २०१८ मध्ये त्यांच्या लग्नाची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले होते, कारण बराच काळ या दोन्ही स्टार्सनी त्यांचे नाते मीडिया आणि चाहत्यांच्या नजरेपासून दूर ठेवले होते. दोघांची भेट हैदराबादमधील दिग्गज भारतीय बॅडमिंटनपटू पुलेला गोपीचंद यांच्या अकादमीत झाली, जिथे दोघेही दिग्गज प्रशिक्षकाच्या देखरेखीखाली प्रशिक्षण घेत होते. इथूनच त्यांची लव्हस्टोरी सुरू झाली.
सायना नेहवालच्या इन्स्टाग्रामवर कश्यपबरोबरचा एकही फोटो दिसत नाहीये. तर याउलट कश्यपच्या इन्स्टाग्रामवर सायनाबरोबरचे फोटो, व्हीडिओ अजूनही तसेच आहेत. मार्चमध्ये सायनाच्या वाढदिवसाला केलेली पोस्टही यामध्ये दिसत आहे. तर काही बॅडमिंटनसंबंधित सायनाबरोबरचे व्हीडिओदेखील आहेत.