पहिल्या दिवसापासून खेळपट्टी फिरकीला पोषक हवी, असे भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने सांगितल्यावर वानखेडेची खेळपट्टी तशी बनवण्यातही आली. पण त्याच्या या चक्रव्यूहात तोच अडकला आणि भारताला पराभव स्वीकारावा लागला. पण तरीही त्याने आपला निर्णय चुकीचा होता, असे म्हटलेले नाही, उलटपक्षी अशीच खेळपट्टी कोलकात्यामध्येही असायला हवी, असे मत त्याने सामन्यानंतर व्यक्त केले आहे.
‘‘फिरकीला पोषक खेळपट्टी असणे, ही आपली खासियत आहे. त्यामुळे नक्कीच कोलकात्यामध्येही अशीच खेळपट्टी असायला हवी. पाटा खेळपट्टीवर खेळण्यात काहीच हशील नाही. त्यावर नाणेफेक जिंकल्यावर तीन-चार दिवस फलंदाजी करण्यात काहीच अर्थ नाही. ही खेळपट्टी चांगली होती, सामन्याचा निकाल लावणारी होती. त्यामुळे नाणेफेकीचे महत्त्व कमी झाले आणि जो संघ चांगला खेळला तो जिंकला. त्यामुळे कोलकातामध्येही पहिल्या दिवसापासून फिरकीला पोषक खेळपट्टी मिळायला हवी,’’ असे मत धोनीने व्यक्त केले.
मेहनत फळली झ्र्कुक
अहमदाबादच्या पहिल्या कसोटी सामन्यात पराभूत झाल्यावर आमच्यावर टीका करण्यात आली होती. त्यानंतर आम्ही वानखेडेमध्ये दाखल झालो. अथक मेहनत घेतली, सरावासाठी अधिकाधिक वेळ दिला आणि हीच घेतलेली सारी मेहनत फळली. विजयाचा आनंद आहेच, सध्या या आनंदात न्हाऊन झाल्यावर कोलकात्याच्या सामन्याचा पुन्हा एकदा गंभीरपणे विचार करू, असे मत इंग्लंडचा कर्णधार अॅलिस्टर कुक याने सामन्यानंतर व्यक्त केले. ‘‘मॉन्टी पनेसार आणि ग्रॅमी स्वान या दोघांनी खासकरून दुसऱ्या डावामध्ये अप्रतिम गोलंदाजी केली. कारण आम्हाला जास्त धावांचा पाठलाग करायचा नव्हता. त्यामुळे या दोघांपुढे आव्हान होते, त्याचे दडपणही होते. पण या दोघांनी अप्रतिम गोलंदाजी केली आणि त्यामुळेच आम्ही हा सामना मोठय़ा फरकाने जिंकू शकलो,’’ असे कुकने सांगितले.
यावेळी सामनावीर केव्हिन पीटरसन म्हणाला की, ‘‘भारतातला प्रत्येक विजय हा मोठाच असतो. मी इथे १८ एकदिवसीय सामना खेळलो आणि त्यातला एकच जिंकू शकलो. आम्ही कसून सराव केला, पण आम्ही नेट्समध्ये नाही तर मैदानात जास्त धावा केल्या. पनेसार आणि स्वान या फिरकीपटूंनी या सामन्यात चमकदार कामगिरी करत विजयात मोलाचा वाटा उचलला.’’