Sarfaraz Khan Weight Transformation Photo Viral: भारतीय संघाचा फलंदाज सर्फराझ खानने वजन घटवलं असून त्याचे फोटो पाहून सर्वच जण चकित झाले आहेत. सर्फराझ खान सध्या भारताच्या वरिष्ठ कसोटी संघाबाहेर आहे. पण इंग्लंड दौऱ्यावर आलेल्या भारताचा अ संघामध्ये सर्फराझचा समावेश होता. सर्फराझने इंग्लंड दौऱ्यापूर्वीच कमालीचं वजन घटवलं होतं. पण आता त्याचा नुकताच समोर आलेला फोटो चकित करणारा आहे.

सर्फराझ खानने ६० दिवसांत १७ किलो वजन घटवलं आहे आणि त्याचा वजन घटवल्यानंतरचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कायमच आपल्या वजनामुळे टीकेला सामोरा जाणारा सर्फराझ आता नव्या अवतारात खूप फिट दिसत आहे.

सर्फराझने इन्स्टाग्रामवर त्याचा ‘जीम’मधील फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याने १७ किलो वजन घटवल्याचं म्हटलंय. सर्फराझचा फोटो पाहून सर्वच चकित झाले असून त्याने २ महिन्यात हे वजन कमी केलंय. त्याचा हा फोटो इंग्लंडचा माजी खेळाडू केविन पीटरसनने शेअर केला आहे आणि त्याच्याखाली कॅप्शन देत त्याने पृथ्वी शॉचं लक्ष वेधलं आहे.

केविन पीटरसनने सर्फराझ खानचा वजन घटवण्यापूर्वीचा आणि वजन घटवल्यानंतरचा फोटो शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये पीटरसनने लिहिलंय, “सर्फराझने कमालीचे कष्ट घेतले आहेत. तुझं खूप खूप अभिनंदन आणि मला खात्री आहे की मैदानावरील चांगल्या आणि सातत्यपूर्ण कामगिरीसाठी याचा फायदा होईल. तुझ्या खेळासाठी काय महत्त्वाचं आहे हे जाणून घेत तू त्यावर काम केलंस हे पाहून छान वाटलं. कोणीतरी हा फोटो पृथ्वी शॉला दाखवाल का? तुम्ही फिट होऊ शकता.”

सर्फराझ खानचा १७ किलो वजन घटवल्यानंतरचा फोटो

पृथ्वी शॉने अलीकडे फिटनेस आणि क्रिकेटकडे दुर्लक्ष केल्याने तो टीम इंडियाच्या बाहेर आहे. इतकंच नव्हे तर देशांतर्गत क्रिकेट आणि आय़पीएलमध्येही पृथ्वीला खेळण्याची संधी मिळत नाहीये. यादरम्यान आता सर्फराझ खानचा वजन घटवल्यानंतरचा फोटो पाहताच केविन पीटरसनने पृथ्वी शॉ ला वजन घटवण्याचा सल्ला दिला आहे.