वेगवान गोलंदाज डेल स्टेनला आपला सर्वोत्तम फॉर्म गवसला आहे. त्यामुळेच वाका मैदानावरील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेची पकड घट्ट आहे. स्टेनच्या चार बळींमुळे ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ५३.१ षटकांत फक्त १६३ धावांत आटोपला आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघाला ६२ धावांची आघाडी मिळाली. त्यानंतर ग्रॅमी स्मिथ आणि हशिम अमला यांनी दमदार फलंदाजी करीत आफ्रिकेचे मनोधर्य आणखी उंचावले.
कप्तान स्मिथ आणि अमला यांनी षटकाला सात धावांची सरासरी राखत दुसऱ्या विकेटसाठी २५.३ षटकांत १७८ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. त्यामुळे जागतिक कसोटी क्रमवारीतील अव्वल स्थान काबीज करण्याच्या द. आफ्रिकेच्या आशा अधिक मजबूत झाल्या आहेत.
दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला, तेव्हा दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात २ बाद २३० अशी मजल मारून आपली एकंदर आघाडी २९२पर्यंत वाढविली होती. अद्याप तीन दिवसांचा खेळ बाकी असून, द. आफ्रिकेचे आठ फलंदाज शिल्लक आहेत. ८४ चेंडूंत ९९ धावांवर खेळणारा अमला आपल्या कसोटी कारकीर्दीमधील १८व्या शतकाच्या उंबरठय़ावर आहे, तर मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर नॅथन लिऑनकडून ३ धावांवर जीवदान मिळालेल्या जॅक कॅलिसच्या खात्यावर १७ धावा जमा आहेत. २००८मध्ये ‘वाका’वरच दक्षिण आफ्रिकेने ४ बाद ४१४ धावांचा यशस्वी पाठलाग केला होता.
दिवसाच्या उत्तरार्धात शतकाकडे कूच करणारा स्मिथ ८४ धावांवर माघारी परतला. स्टार्कच्या गोलंदाजीवर लिऑनने डीप स्क्वेअर लेगला त्याचा अप्रतिम सूर मारून झेल टिपला.
२ बाद ३३ धावांवर प्रारंभ करणाऱ्या यजमानांचा पहिला डाव अल्पावधीच गडगडला. अखेरचा कसोटी सामना खेळणाऱ्या रिकी पाँटिंगला व्हर्नन फिलँडरने ४ धावांवर पायचीत केले, तर बेफाम फॉर्मात असलेला ऑसी संघनायक मायकेल क्लार्कने (५) निराशा केली. त्यामुळे यजमान संघाची ६ बाद ४५ अशी दयनीय अवस्था झाली. त्यांचे चार फलंदाज फक्त ११ धावांत बाद झाले. त्यानंतर मॅथ्यू व्ॉडने १०२ चेंडूंत ७ चौकार आणि ३ षटकारांसह ६८ धावांची झुंज खेळी साकारून संघाचा डाव सावरला. व्ॉडने सातव्या विकेटसाठी मायकेल हसी (१२) याच्यासोबत ५५ धावांची, तर जॉन हॅस्टिंग्स (३२)सोबत आठव्या विकेटसाठी ४० धावांची भागीदारी रचली.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Dec 2012 रोजी प्रकाशित
दक्षिण आफ्रिकेचा वरचष्मा
वेगवान गोलंदाज डेल स्टेनला आपला सर्वोत्तम फॉर्म गवसला आहे. त्यामुळेच वाका मैदानावरील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेची पकड घट्ट आहे.

First published on: 02-12-2012 at 02:22 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Steyn amla lead south african fightback