हिरवळीवरच्या टेनिस मेजवानीला सोमवारपासून विम्बल्डननगरीत सुरुवात होणार आहे. विम्बल्डनची सात जेतेपदे नावावर असलेला आणि गतविजेता रॉजर फेडरर आपल्या मोहिमेचा आरंभ करणार आहे. गेल्या वर्षी विम्बल्डन स्पर्धेच्या जेतेपदानंतर फेडरर जेतेपदांच्या दुष्काळाला सामोरा जात आहे. त्याचा फॉर्म ढेपाळला आहे तर पाठीच्या दुखण्यानेही त्याला पछाडले आहे. मात्र हे विसरून विम्बल्डनच्या जेतेपदासाठी फेडरर सज्ज झाला आहे. त्याची सलामीची लढत रोमानियाच्या व्हिक्टर हानेस्क्युशी होणार आहे. विजयी सलामीसाठी फेडरर उत्सुक असेल.
गुडघ्याच्या दुखापतीनंतर झंझावाती पुनरागमन करणारा राफेल नदालही आपल्या विम्बल्डन प्रवासाचा प्रारंभ सोमवारी करणार आहे. ग्रास कोर्टवर नदालचा पहिला सामना बेल्जियमच्या स्टीव्ह डार्सिसविरुद्ध होणार आहे.
घरच्या मैदानावर दणक्यात सुरुवात करण्यासाठी इंग्लंडचा अँडी मरे आतूर आहे. गेल्या वर्षी याच स्पर्धेच्या अंतिम फेरीत त्याला निसटत्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्या कटू आठवणी बाजूला सारत जेतेपदाचा मुकुट पटकावण्यासाठी मरे आसुसला आहे. त्याचा सलामीचा मुकाबला जर्मनीच्या बेंजामिन बेकरशी होणार आहे. नुकत्याच झालेल्या फ्रेंच खुल्या स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानणारी मारिया शारापोव्हा नव्या ऊर्जेने विम्बल्डनच्या हिरवळीवर आपल्या अभियानाला सुरुवात करणार आहे. सौंदर्यवती शारापोव्हाला तब्बल नऊ वर्षांपूर्वी विम्बल्डनच्या जेतेपदावर कब्जा करता आला होता. सातत्यपूर्ण कामगिरीनंतरही हुलकावणी देणाऱ्या जेतेपदाला आपल्या नावावर करण्यासाठी शारापोव्हा उत्सुक आहे. तिची पहिली लढत ख्रिस्टिना म्लाडेनोव्हिकविरुद्ध होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thrill of wimbledon starts today